कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांची महत्त्वपूर्ण इराण भेट

इराण भेटदुबई/तेहरान – कतारचे परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांनी गुरुवारी इराणला भेट दिली. कतार आणि इराणमधील सहकार्यावर चर्चा करण्यासाठी ही भेट आधारीत असल्याचा दावा इराण करीत आहे. पण अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या अणुकराराबाबतच्या वाटाघाटींच्या पार्श्‍वभूमीवर कतार महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचा दावा केला जातो. यासाठी कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला भेट दिली असून पुढच्या आठवड्यात कतारचे राष्ट्रप्रमुख अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या इराणबरोबरच्या अणुकराराबाबतच्या वाटाघाटींविषयी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. ब्रिटनमधील अरब वृत्तवाहिनीने अमेरिका व इराणमध्ये अणुकरार झाल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर हा अणुकरार संपन्न करण्यासाठी रशिया प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यासाठी अमेरिकेने रशियाला विचारणा केल्याचे बोलले जात होते.

इराणने याबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती. याउलट व्हिएन्ना येथील चर्चेतून विशेष काही निष्पन्न होणार नसल्याचे इराणने जाहीर केले होते. सोमवारी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दोल्लाहियान यांनी चांगल्या अणुकरारासाठी अमेरिकेबरोबर थेट चर्चा करण्याचे संकेत दिले होते. अमेरिकेला मान्य असेल तर इराण थेट चर्चा करण्यास तयार असल्याचे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानंतर कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री अब्दोल्लाहियान यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कतार अमेरिका आणि इराणमधील अणुकरारासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

इराण भेटकाही दिवसांपूर्वी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कतारची राजधानी दोहाला भेट दिली होती. यावेळी इराणच्या ताब्यातील अमेरिकी व युरोपिय नागरिकांच्या सुटकेबाबत चर्चा झाली होती. पुढच्या काही दिवसांमध्ये अमेरिकेने इराणकडे केलेल्या सशर्त मागणीमध्ये याचाही समावेश होता. यावरुन अमेरिका व इराणमधील अणुकरारासाठी कतार मध्यस्थी करीत असल्याचे उघड होत आहे, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत.

पुढच्या आठवड्यात, ३१ जानेवारी रोजी कतारचे राष्ट्रप्रमुख अमिर शेख तमिम बिन हमात अल-थानी अमेरिकेच्या भेटीवर जाणार असून ते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेणार आहेत. यावेळी अमेरिका व कतारच्या नेतृत्वात ऊर्जा सुरक्षा आणि इराणच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत, कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांची इराण भेट अणुकराराशी संबंधित असल्याचा दावा केला जातो. पण इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने हा दावा फेटाळला. परराष्ट्रमंत्री थानी यांची ही भेट अमेरिकेबरोबरच्या अणुकराराशी संबंधित नसल्याचे इराणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

leave a reply