येत्या चार महिन्यात लडाखमध्ये ३६ हेलिपॅड कार्यरत होणार

कारगिल – भारत व चीनदरम्यान ‘एलएसी’वर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने लडाखमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीला जबरदस्त वेग दिला आहे. गेल्या वर्षभरात लडाखमधील दुर्गम क्षेत्रांना विविध भागांशी जोडणार्‍या रस्त्यांची व पुलांची उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर आता संपूर्ण लडाखमध्ये एकाच वेळी ३६ जागी हेलिपॅड्सची उभारणी करण्यात येत असून येत्या चार महिन्यात ही योजना पूर्ण होईल.

लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथुर यांनी नुकतीच विविध भागांमध्ये उभारण्यात येणार्‍या हेलिपॅड्सच्या बांधकामाचा आढावा घेतला. लडाखच्या लेह जिल्ह्यात १९ ठिकाणी तर कारगिल जिल्ह्यात १७ जागी हेलिपॅड्सची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती सरकारी प्रवक्त्यांनी दिली. हा लडाखमधील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचेही सांगण्यात येते.

लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनच्या लष्करामध्ये गेल्या सात महिन्यांपासून फार मोठा तणाव निर्माण झाला आहे. चीनने लडाखच्या एलएसीजवळ सुमारे ५० हजार जवान तैनात ठेवल्याच्या बातम्याही आल्या होत्या. भारतानेही तोडीस तोड तैनाती करून चीनला प्रत्युत्तर दिले होते. त्याचवेळी या सैनिकांना रसद व इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी वायुसेनेची विमाने व हेलिकॉप्टर्स सातत्याने उड्डण करीत आहेत. पुढच्या काळात इथली संरक्षणसिद्धता अधिकच वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून लडाखमध्ये ३६ नव्या हेलिपॅड्सची निर्मिती हा या प्रयत्नांचा भाग ठरतो.

leave a reply