रशिया-युक्रेन युद्ध व फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य निर्णयाच्या पार्श्वभूमीवर

आशियाई व युरोपिय शेअरबाजारांमध्ये घसरण

asian-stocks-sink-yields-riseटोकिओ/ब्रुसेल्स – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची घोषणा व फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरानाबाबत येणारा निर्णय या पार्श्वभूमीवर बुधवारी आशिया व युरोपातील शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली. जपान, दक्षिण कोरिया तसेच चीनमधील शेअर निर्देशांकांमध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. तर युरोपिय शेअरबाजारही अर्धा ते एक टक्का खाली आल्याचे दिसून आले. शेअर घसरत असतानाच सोने, इंधन व सरकारी रोख्यांची मागणी वाढल्याचे दिसून आले.

युरोपातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या फ्रान्स व जर्मनीमधील शेअरनिर्देशांकात घसरण झाली. त्यानंतर युरोपातील मध्यवर्ती शेअर निर्देशांक असणाऱ्या ‘युरो स्टॉक्स 50’ व ‘युरोपिअन स्टॉक्स 600’ या दोन्ही निर्देशांकही खाली आले. ‘युरोपिअन स्टॉक्स 600’मध्ये व ‘युरो स्टॉक्स 50’मध्ये एक टक्क्याची घसरण झाली. जर्मनीतील इंधनकंपनी युनिपरचे समभाग 20 टक्क्यांहून अधिक खाली आले. तर जपानमधील आघाडीचा शेअरनिर्देशांक ‘निक्केई’, तसेच दक्षिण कोरियातील ‘हँगसेंग’ व चीनमधील ‘ब्ल्यू चिप्स’ निर्देशांकातही एक ते दीड टक्क्यांची घसरण झाली.

china-currencyशेअरबाजार घसरत असतानाच सोने, इंधन व सरकारी रोख्यांची मागणी वाढल्याची माहिती माध्यमे तसेच विश्लेषकांनी दिली आहे. इंधनाच्या दरांमध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. गुंतवणूकदार अधिकाधिक सुरक्षित घटकांमध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेतही पडझड सुरू असल्याने गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात 0.75 टक्के वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. या वाढीनंतरही अमेरिकी अर्थव्यवस्थेत फारशी सुधारणा होण्याची आशा नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. काही अर्थतज्ज्ञांनी अमेरिका व युरोपातील आघाडीच्या अर्थव्यवस्था आधीच मंदीत असल्याचे बजावले आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांना होणाऱ्या नुकसानीची व्याप्ती अधिक वाढू शकते, असे संकेत नव्या घसरणीतून मिळत आहेत.

leave a reply