युरोपातील निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी बाल्कन देशांचा ‘शेन्गेन’मध्ये समावेश करा

- झेक रिपब्लिकच्या पंतप्रधानांचा सल्ला

‘शेन्गेन’प्राग/ब्रुसेल्स – युरोपिय देशांमध्ये येणारे अवैध निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी बाल्कन देशांचा ‘शेन्गेन एरिआ’मध्ये समावेश करा, असा सल्ला झेक रिपब्लिकच्या पंतप्रधानांनी दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत ‘शेन्गेन’ सुविधा निर्वासितांना रोखण्यात अपयशी ठरल्याचा दावाही पंतप्रधान अँड्रेज बॅबिस यांनी केला. 2015 साली युरोपात आलेल्या निर्वासितांच्या संकटामागेही ‘शेन्गेन’चे अपयशच कारणीभूत ठरले होते, असा आरोपही बॅबिस यांनी केला.

2015 साली व त्यानंतर जर्मनीने आखात व आशियातून येणाऱ्या निर्वासितांसाठी ‘ओपन डोअर पॉलिसी’ जाहीर केली होती. त्याचा फायदा उठवून 10 लाखांहून अधिक निर्वासितांनी युरोपिय महासंघात घुसखोरी केली होती. त्याचे विपरित परिणाम युरोपियन संस्कृती व मूल्यांवर झाले असून युरोपची सुरक्षाही धोक्यात आली आहे. या संकटातून युरोप अद्याप सावरलेला नसल्याकडे विविध देशांमधील नेते तसेच विश्‍लेषक लक्ष वेधीत आहेत. झेक पंतप्रधानांनी केलेले वक्तव्यही त्याचाच भाग असल्याचे दिसते.

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविला आहे. या पार्श्‍वभूमीवर, पुढील वर्षभरात लाखो अफगाणी देशातून पलायन करून इतर देशांमध्ये निर्वासित म्हणून दाखल होतील, असा इशारा आंतरराष्ट्रीय गटांनी दिला आहे. युरोपातही हजारो अफगाणी निर्वासित धडकण्याची शक्यता असून अनेक सदस्य देशांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच, युरोपिय महासंघ 2015 साली आलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यांप्रमाणे पुन्हा नव्या लोंढ्यांना सामावून घेण्यास अजिबात तयार नाही, असा इशारा ग्रीसचे मायग्रेशन मिनिस्टर नोतिस मिताराची यांनी दिला होता.

ग्रीस व तुर्कीसारख्या देशांनी आपल्या सीमांवर ‘बॉर्डर वॉल’ उभारून निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. पोलंड व लिथुआनियासारख्या देशांनीही सीमांवर तारेचे कुंपण उभारून लष्कर तैनात केले आहे. काही देशांनी आफ्रिकी देशांशी करार करीत निर्वासितांची सोय त्या देशांमध्ये करण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, झेक पंतप्रधान बॅबिस यांनी निर्वासितांना रोखण्यासाठी बाल्कन देशांचा समावेश करण्याबाबत दिलेला सल्ला लक्ष वेधून घेणारा ठरतो.

बॅबिस यांनी क्रोएशिया, रोमानिया, बल्गेरिया व सर्बिया या बाल्कन देशांचा ‘शेन्गेन’मध्ये समावेश करावा, असा सल्ला दिला आहे. या देशांना ‘शेन्गेन’मध्ये घेतल्यास निर्वासितांपासून युरोप सीमांची सुरक्षा करणे अधिक सुलभ होईल, असा दावा बॅबिस यांनी केला आहे. त्याचवेळी ट्युनिशिआ, मोरोक्को, अल्जेरिया, लिबिया यासारख्या देशांशी निर्वासितांसंदर्भात करार करायला हवेत, असेही झेक पंतप्रधानांनी सुचविले आहे.

कोणत्याही परिस्थितीत निर्वासितांच्या लोंढ्यांच्या घुसखोरीपासून युरोपला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे, असे झेक रिपब्लिकचे पंतप्रधान अँड्रेज बॅबिस यांनी बजावले. 2015 साली ज्यांनी निर्वासितांचे स्वागत केले होते, त्यातील काही देश आता निर्वासितांना नाकारत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 2015 साली युरोपिय महासंघाने निर्वासितांचा कोटा सदस्य देशांना ठरवून दिला होता. हा कोटा नाकारण्यात हंगेरीसह पोलंड व झेक रिपब्लिक या देशांनी पुढाकार घेतला होता.

leave a reply