अमेरिकेच्या पर्यायांना प्रत्युत्तर देण्याचा इराणला अधिकार आहे

- इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा

प्रत्युत्तर देण्याचातेहरान/वॉशिंग्टन – अमेरिकेने इराणविरोधात इतर पर्याय वापरण्याबाबत केलेले वक्तव्य ही धमकी असून, त्याविरोधात प्रत्युत्तर देण्याचा अधिकार इराणला आहे, असा इशारा इराणचे वरिष्ठ अधिकारी अली शामखानी यांनी दिला आहे. अमेरिकेबरोबरच इस्रायलला बजावण्यात आले असून इस्रायलच्या कोणत्याही साहसाविरोधात कारवाई करण्याचा हक्क इराणला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी बजावले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता. यावेळी अमेरिका व इस्रायलकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांच्या पार्श्‍वभूमीवर इराणने आक्रमक भूमिका घेतल्याचे नव्या इशाऱ्यांवरून दिसून येते.

गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी अमेरिकेला भेट दिली होती. यावेळी इराणचा अणुकार्यक्रम व आखातातील इतर घडामोडींवर बेनेट व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात चर्चा झाली होती. इस्रायली पंतप्रधानांनी यावेळी इराणविरोधात ‘डेथ बाय थाऊजंड कट्स’चे धोरण ठेवल्याचा दावा अमेरिकी वृत्तसंस्थांनी केला होता. यावेळी बायडेन यांनी आपण अणुकरारावरील वाटाघाटींना प्राथमिकता देत असल्याचे बेनेट यांना सांगितले होते. त्याचवेळी चर्चा अपयशी ठरली तर अमेरिका इतर पर्यायांचा वापर करेल, असेही म्हटले होते.

‘अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर इराणकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे. ‘इराणविरोधात इतर पर्यायांचा वापर करण्यावर दिलेला भर म्हणजे इराणला दिलेली धमकी आहे. ही धमकी बेकायदेशीर आहे. अमेरिकेच्या या धमकीविरोधात प्रत्युत्तर देण्याचा इराणला पूर्ण अधिकार आहे’, असा इशारा इराणच्या ‘सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’चे सचिव अली शामखानी यांनी दिला. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनीही बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

प्रत्युत्तर देण्याचा‘अमेरिकेचे सध्याचे प्रशासन यापूर्वीच्या प्रशासनापेक्षा वेगळे नाही. अणुकार्यक्रमाच्या मुद्यावर ट्रम्प यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच मागण्या बायडेन प्रशासनाने वेगळ्या शब्दात पुढे केल्या आहेत. या मुद्यावर अमेरिकेला कसलीही लाज उरलेली नाही. जणू काही इराणच अणुकरारातून बाहेर पडला असावा, अशा रितीने अमेरिकेची बोलणी सुरू आहेत’, अशी टीका खामेनी यांनी केली. खामेनी यांनी अफगाणिस्तानचा संदर्भ देत अमेरिका म्हणजे ‘लांडगा’ व कधीकधी ‘धूर्त कोल्हा’ असल्याचा टोलाही लगावला.

खामेनी व शामखानी यांनी अमेरिकेला दिलेल्या इशाऱ्यापाठोपाठ इराणच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी इस्रायलला धमकावले आहे. ‘इस्रायलच्या राजवटीने कोणतेही चुकीचे पाऊल अथवा साहसी कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर आपले हितसंबंध व सार्वभौमत्त्व यांचे रक्षण करण्यासाठी कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार इराणला आहे’, असे इराणच्या राजदूत झाहरा ईर्शादी यांनी बजावले. ईर्शादी यांनी इराणला अणुऊर्जेचे संशोधन व इतर बाबी सुरू ठेवण्याचाही हक्क असल्याचे सांगत अणुकार्यक्रमाचेही समर्थन केले.

दरम्यान, इराणचे नवे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिर अब्दोलाहिअन यांनी सिरियाचा दौरा केला. रविवारी त्यांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांची भेट घेतली. या भेटीत इराण व सिरियाने अमेरिकी निर्बंधांना एकजुटीने प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला. इराणच्या नव्या राजवटीच्या नेतृत्त्वाखाली दोन देशांमधील संबंध अधिक भक्कम होतील, असा दावाही परराष्ट्रमंत्री हुसेन अमिर अब्दोलाहिअन यांनी केला.

leave a reply