भारतीय लष्करात ‘स्वार्म ड्रोन्स’चा समावेश

नवी दिल्ली – भारतीय लष्करामध्ये ‘स्वार्म ड्रोन’चा समावेश झाला आहे. छोट्या ड्रोन्सचा समुह अर्थात स्वाम ड्रोन यंत्रणेमुळे भारताची सीमा सुरक्षा अधिकच भक्कम होईल. लवकरच याची पाकिस्तान व चीनच्या सीमेवर तैनाती केली जाईल, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.

पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील घुसखोरीची आव्हाने वाढत असताना भारतीय लष्करासाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा वापर करणे आवश्यक बनले आहे. विशेषतः घुसखोर तसेच दहशतवाद्यांना थेट भिडण्याची जोखीम पत्करण्याच्या ऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना संपविण्याची क्षमता भारतीय लष्कराकडे येणे अनिवार्य बनले होते. स्वार्म डोन्सच्या सहभागामुळे भारतीय लष्कराला ही क्षमता प्राप्त होईल. यामुळे घुसखोर तसेच दहशतवाद्यांचा माग काढणे सोपे जाणार असून त्यांच्यावर सुलभतेने हल्ला चढविणेही सहजशक्य होईल.

आत्ताच्या काळातील युद्धांमध्ये ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नुकत्याच झालेल्या अर्मेनिया-अझरबैजान युद्धात तसेच सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेनच्या युद्धात देखील ड्रोन्सचा वापर होत आहे. इतकेच नाही तर येमेनसारख्या मागासलेल्या देशामधील बंडखोर देखील सौदीसारख्या देशाला आव्हान देण्यासाठी ड्रोन हल्ले चढवित आहेत. अशा परिस्थितीत भारताला आपली ड्रोनविषयक क्षमता वाढविणे भाग होते.

यानुसार भारताने पावले उचलली असून यावर्षाच्या प्रजासत्ताक दिनी भारतीय लष्कराने एकाच वेळी हजार ड्रोन्स उडवून आपल्याकडे ही क्षमता असल्याची जाणीव करून दिली. याच्याही पलिकडे जाऊन स्वार्म ड्रोन्स भारतीय लष्करात सहभागी झाल्याच्या बातम्या आल्याने, या आघाडीवरील भारताच्या सामर्थ्यात वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

leave a reply