तैवानचे युद्ध पेटल्यास चीनला रोखण्याकरिता अमेरिकेसाठी भारत सर्वात महत्त्वाचा देश ठरेल

- अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांचा दावा

वॉशिंग्टन – ‘तैवानच्या विरोधात चीनने आगळीक केलीच, तर चीनला रोखण्यासाठी जपानसह भारत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल. चीनच्या तैवानवरील आक्रमणानंतर भारत या युद्धात अमेरिकेच्या बाजूने उतरला नाही, तरीही भारत चीनच्या विरोधात आघाडी उघडून अमेरिकेच्या डावपेचांना सहाय्य करू शकेल’, असे अमेरिकन नौदलाचे वरिष्ठ अधिकारी ॲडमिरल माईक गिल्डे यांनी म्हटले आहे. याच कारणामुळे आपण दुसऱ्या कुठल्याही देशापेक्षा अधिकवेळा भारताला भेट दिलेली आहे. भारत हा अमेरिकेचा भविष्यातील सर्वात महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार देश ठरतो, असा निर्वाळा ॲडमिरल गिल्डे यांनी दिला.

वॉशिंग्टनमध्ये ‘हेरिटेज फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ॲडमिरल गिल्डे बोलत होते. हिंदी महासागर क्षेत्रातील भारतीय नौदलाच्या युद्धनौका अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. यामुळे चीनला तैवानच्या आखातात पूर्णपणे लक्ष केंद्रीत करता येऊ शकत नाही. त्यातच चीनने लडाखच्या एलएसीवर भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यामुळे भारत तैवानचा घास गिळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला एकाच वेळी दोन आघाड्यांवर गुंतवून ठेवू शकतो. म्हणूनच अमेरिकेच्या व्यूहरचनेत भारताला अतिशय महत्त्वाचे स्थान असून अमेरिकेच्या धोरणकर्त्यांना भारताचे विशेष आकर्षण वाटत आले आहे, असे ॲडमिरल गिल्डे यांनी स्पष्ट केले.

याच कारणामुळे आपण आत्तापर्यंत दुसऱ्या कुठल्याही देशाला भेट दिली नव्हती, इतक्या प्रमाणात भारताचा दौरा केला, अशी माहिती ॲडमिरल गिल्डे यांनी दिली. निक्केई एशिया या जपानच्या वृत्तसंस्थेने याबाबचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. आपले तटस्थ धोरण सोडून भारत तैवानसाठी अमेरिकेने पुकारलेल्या युद्धात उतरणार नाही, असे अमेरिकेच्या पेंटॅगॉनच्या माजी अधिकाऱ्यांनी म्हटले होते, याची आठवण या वृत्तसंस्थेने करून दिली. असे असले तरी भारत चीनच्या विरोधात दुसरी आघाडी सुरू करून चीनला धक्का देऊ शकतो. हे चीनसाठी ‘टू फ्रंट वॉर’ अर्थात दोन आघाड्यांवरील युद्ध ठरेल. ही बाब चीनला भलतीच महाग पडू शकते, असा दावा एलब्रिज कॉल्बी पेंटॅगॉनच्या माजी अधिकाऱ्यांनी केला होता.

लडाखच्या प्रतिकूल हवामानात चीनचे लष्कर तग धरू शकत नाही, याकडे लक्ष वेधून भारत या स्थितीचा फार मोठा लाभ घेऊ शकतो, असा दावा कॉल्बी यांनी केला होता. 2018 साली कॉल्बी यांनी अमेरिका व जपानला चीनच्या विरोधात भारताची आवश्यकता भासेल, असे बजावले होते. चीनला थेट सीमा भिडलेला आणि प्रचंड लष्करी सामर्थ्य असलेला भारत अमेरिकेसाठी खूपच महत्त्वाचा सामरिक भागीदार देश ठरतो, याची जाणीव इतर विश्लेषकांनीही करून दिली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन देखील सातत्याने भारत हा न बदलता येण्याजोगा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार देश असल्याचे सातत्याने सांगत आहे.

मात्र भारताला वगळून व क्वाडला बाजूला सारून बायडेन प्रशासनाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या विरोधात इतर देशांच्या आघाड्या उघडल्या आहेत. त्यामुळे क्वाडचे सहकार्य अधिक भक्कम करण्याऐवजी बायडेन प्रशासन अमेरिकेच्या इतर हितसंबंधांना अधिक महत्त्व देत असल्याचे दिसते. मात्र अमेरिकन संरक्षणदलांकडून वारंवार भारताचे महत्त्व अधोरेखित केले जात असून ॲडमिरल गिल्डे यांचे उद्गार याची साक्ष देत आहेत.

leave a reply