‘स्वतंत्र तैवान’साठी सुरू असलेल्या प्रयत्नांची अखेर वाईटच असेल

- चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

‘स्वतंत्र तैवान’साठीबीजिंग – तैवानच्या मुद्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरातून जोरदार प्रतिक्रिया उमटत असताना चीनने तैवान व तैवानसमर्थक देशांना सज्जड इशारा दिला. ‘तैवानच्या स्वातंत्र्यासाठी विघटनवादी गटांचे सुरू असलेले प्रयत्न आणि परदेशातून मिळणारे सहाय्य यांची अखेर अतिशय वाईटच असेल. चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी कुठल्याही शत्रूला घाबरत नाही. चीनच्या दिशेने पावले टाकणाऱ्या प्रत्येक शत्रूचा पराभव करण्याची हिंमत व विश्वास आमच्या लष्करामध्ये आहे’, असा इशारा चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांनी दिला. पण चीनच्या या धमक्यांना तैवानने देखील जोरदार उत्तर दिले आहे. बुधवारी तैवानने क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या अत्यंत प्रगत लढाऊ विमानांचा सराव केला.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ तैवानमध्ये दाखल झाले होते. अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर अवघ्या १२ दिवसांनी अमेरिकेचे हे शिष्टमंडळ तैवानच्या भेटीवर आल्यामुळे चीनचा पारा चढला आहे. रशियामध्ये आयोजित केलेल्या ‘मॉस्को कॉन्फरन्स ऑन इंटरनॅशनल सिक्युरिटी’च्या बैठकीला ऑनलाईन संबोधित करताना चीनचे संरक्षणमंत्री फेंघे यांनी तैवान तसेच तैवानच्या पाठिशी असलेल्या अमेरिका, युरोपिय देशांना इशारा दिला.

‘स्वतंत्र तैवान’साठी‘अमेरिकेच्या नेत्यांची तैवान भेट चीनच्या धोरणांचे गंभीर उल्लंघन ठरते. यामुळे तैवानमध्ये स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या विघटनवादी गटांना चुकीचा संदेश मिळत आहे. चीनच्या अंतर्गत कारभारातील हस्तक्षेप अजिबात खपवून घेणार नाही’, असे चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी बजावले. त्याचबरोबर तैवानच्या स्वातंत्र्यासाठी विघटनवाद्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचा शेवट अजिबात चांगला नसेल आणि या विघटनवाद्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरातून केले जाणारे सहाय्य यशस्वी ठरणार नाही, असा दावा संरक्षणमंत्री फेंघे यांनी केला.

तर ‘पेलोसी व अन्य अमेरिकन नेत्यांची तैवान भेट आयोजित करून अमेरिका अतिशय सुमार दर्जाचे राजकारण करीत आहे. यामुळे तैवानच्या आखातातील शांती आणि स्थैर्य बाधित होईल. चीनचे लष्कर युद्धाची तयारी करीत असून आमच्या कारवाईत तैवानच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देणारे विघटनवादी आणि परदेशी हस्तक चिरडले जातील’, अशी धमकीच संरक्षणमंत्री फेंघे यांनी मॉस्कोतील बैठकीतून दिली.

लष्करी कारवाईबरोबर चीनने तैवानवर आर्थिक कारवाईचा बडगा उगारला आहे. काही तासांपूर्वी चीनने स्वतंत्र तैवानची मागणी करणाऱ्या तैवानी नेत्यांना आर्थिक सहाय्य पुरविणाऱ्या सात तैवानींवर निर्बंधांची कारवाई केली आहे.

तर तैवानने चीनच्या चिथावणीखोर युद्धसरावांना प्रत्युत्तर देणारे सराव आयोजित केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेच्या सहाय्याने अद्ययावत केलेली तैवानच्या हवाईदलातील ‘एफ-१६व्ही’ लढाऊ विमानांनी बुधवारपासून नवा सराव सुरू केला आहे. विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ही विमाने चीनच्या लष्करी सरावाला उत्तर असल्याचा दावा तैवानमधील माध्यमे करीत आहेत. गेल्या दहा दिवसात तैवानने दुसऱ्यांदा चीनच्या तोडीस तोड युद्धसराव आयोजित करून आपण चीनच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे दाखवून दिले. यामुळे चीनच्या अस्वस्थतेत अधिकच भर पडल्याचे दिसत आहे.

leave a reply