अमेरिकेचा डॉलर बाजूला सारून भारत व श्रीलंका रुपयात व्यवहार करणार

रुपयांमध्ये व्यवहाराची तयारी करणाऱ्या देशांची संख्या 50वर

नवी दिल्ली – श्रीलंकेने भारताच्या रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखविली असून दोन्ही देशांमधील व्यवहारातून आता आंतरराष्ट्रीय चलन असलेला डॉलर बाजूला पडेल. श्रीलंकाच नाही तर रशिया, मॉरिशस, म्यानमार, मलेशिया, सिंगापूर, इस्रायल व जर्मनीने देखील रुपयामध्ये व्यवहार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या व्यवहारासाठी ‘स्पेशल रुपी वोस्त्रो अकाऊंट-एसआरबीए’ खाते उघडणाऱ्या देशांची संख्या 50वर गेली आहे. यामुळे भारताचा रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून उदयाला येत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

rupee1_1-sixteen_nineयुक्रेनच्या युद्धानंतर अमेरिकेने आंतरराष्ट्रीय चलन बनलेल्या डॉलरचा शस्त्रासारखा वापर केला होता. याचे विपरित परिणाम होतील व आंतरराष्ट्रीय चलन म्हणून डॉलरचे स्थान धोक्यात येईल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील अमेरिकेला यावरून समज दिली होती. याचे परिणाम दिसू लागले असून रशियाबरोबर व्यवहार करू पाहणारे देश अमेरिकन डॉलरचा व्यवहार टाळून रशियाशी स्थानिक चलनांमध्ये व्यवहार करू लागले आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. रशियाकडून प्रचंड प्रमाणात इंधनाची खरेदी करणाऱ्या भारताने रुपया-रुबलमध्ये व्यवहार करण्यासाठी पावले उचलली आहेत.

trade in rupeeयानुसार रशियन बँकांनी भारतीय बँकांमध्ये वोस्त्रो खाती उघडली आहेत. रशियाच्या पाठोपाठ इतर देश देखील भारताशी अशा स्वरुपाचा व्यवहार करण्यासाठी झपाट्याने पावले उचलत असल्याचे दिसते. वोस्त्रो खाती उघडणाऱ्या देशांची संख्या आता 50वर गेली असून भारताच्या रुपयाची विश्वासार्हता यामुळे प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणूनच रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून उदयाला येत असल्याचे दावे केले जातात.

विकसित देशांनी देखील भारताबरोबर रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखवून याला दुजोरा दिल्याचे दिसते आहे. दोन देशांमधील व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलरचा आजवर वापर होत होता. डॉलरसह युरोपिय महासंघाचे युरो हे राखीव आंतरराष्ट्रीय चलन बनले होते. मात्र भारताबरोबरील व्यापारात रुपयाचा वापर सुरू झाल्याने द्विपक्षीय व्यापाराची स्थितीगती पालटू शकते. रिझर्व्ह बँकेने इतर देशांना रुपयांमधील व्यवहार सुलभतेने करता यावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून यासाठी बँकांना आदेश दिले आहेत. भारताला मोठ्या प्रमाणात निर्यात करणारे देश द्विपक्षीय व्यापारातील ‘सरप्लस’ अर्थात अतिरिक्त रक्कम भारत सरकारचे रोख्यांमध्ये गुंतवण्याचा आकर्षक पर्यायही रिझर्व्ह बँकेने उपलब्ध करून दिला आहे. यामुळे भारतात होणारी गुंतवणूक प्रचंड प्रमाणात वाढू शकते. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या काही जबाबदार अर्थतज्ज्ञांनी भारताचा रुपया पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय चलन बनणार असल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. ही प्रक्रिया सुरू देखील झालेली आहे, असे या अर्थतज्ज्ञांनी म्हटले होते.

leave a reply