अंदमानच्या सागरात भारत आणि थायलंडच्या नौदलाची संयुक्त गस्त सुरु

नवी दिल्ली – हिंदी महासागरात चीनच्या हालचाली वाढलेल्या असताना अंदमानच्या सागरात भारत आणि थायलंडच्या नौदलामध्ये तीन दिवसांचा ‘कॉर्डिनेटेड पेट्रोल’ (सीओआरपीएटी) अर्थात गस्त सुरु झाली आहे. हिंदी महासागरात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या हेतूने ही गस्त आयोजित करण्यात आली आहे. या गस्तीच्या माध्यमातून सागरी दहशतवाद, चाचेगिरी, अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीवर लक्ष ठेवले जात आहे. गेल्याच वर्षी बंगालच्या उपसागरात भारत, अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या ‘क्वाड’ सदस्य देशांचा ‘मलाबार’ संयुक्त सराव पार पडला होता. हा सराव हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढविणार्‍या चीनला इशारा देणारा होता.

गस्तबुधवारपासून अंदमानच्या सागरात सुरु झालेल्या भारत आणि थायलंडच्या नौदलाच्या संयुक्त गस्तीमध्ये भारतीय नौदलाचे गस्ती जहाज ‘आयएनएस शरयू’ आणि थायलंडच्या नौदलाचे जहाज ‘थ्रबी’ आणि डॉर्निअर सागरी गस्त विमान सहभागी झाले आहे. भारत आणि थायलंडच्या नौदलाची ही 31वी सागरी गस्त आहे. 2005 सालापासून उभय देशांच्या नौदलामध्ये हिंदी महासागरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही गस्त सुरु आहे. यामुळे तस्करी, अवैध स्थलांतर रोखले जाते. तसेच समुद्रात शोध आणि बचाव मोहिमांसाठी ही गस्त उपयुक्त ठरते.

भारत आणि थायलंडमधील या सागरी गस्तीमुळे उभय देशांमधील नौदल सहकार्य दृढ होईल, असा विश्वास भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवाल यांनी व्यक्त केला. गेल्या काही वर्षांपासून भारतीय नौदलाने हिंदी महासागरातील आपले वर्चस्व वाढविले आहे. दरम्यान, भारतीय नौदल ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ (सागर) अंतर्गत हिंदी महासागर क्षेत्रातील देशांसोबतचे सहकार्य दृढ करीत आहे.या माध्यमातून प्रादेशिक सागरी सुरक्षा वाढविण्यावर भर दिला जात आहे.

leave a reply