भारत तालिबानशी चर्चा करीत असल्याचे दावे

नवी दिल्ली – भारत तालिबानशी चर्चा करण्यासाठी तयार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. भारताच्या भूमिकेत झालेला हा फार मोठा बदल असल्याचे दावे केले जातात. मात्र या वृत्ताला अधिकृत पातळीवर दुजोरा मिळू शकलेला नाही. पण गेल्या काही महिन्यांपासून तालिबान भारताशी चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळत होते. तालिबान भारताला अनुकूल असलेली भूमिका स्वीकारीत असल्याचा आरोप करून काही पाकिस्तानी पत्रकारांनी तालिबानवर सडकून टीका केली होती. तर अमेरिकेचे अफगाणिस्तान-पाकिस्तानविषयक विशेषदूत झल्मे खलिलझाद यांनी भारताला तालिबानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता.

तालिबानशी चर्चाअफगाणिस्तानातील लोकनियुक्त सरकारला आपला पाठिंबा असेल, असे भारताने वेळोवेळी जाहीर केले होते. तसेच गेल्या वर्षी कतारच्या दोहा येथे अमेरिका व तालिबानमध्ये झालेल्या शांतीकरारावर भारताने सावध प्रतिक्रिया दिली होती. तालिबानने अजूनही हिंसाचार थांबविलेला नाही, याकडे भारत सातत्याने लक्ष वेधत आला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे विशेषदूत खलिलझाद यांनी आपल्या भारतभेटीत तालिबानशी चर्चा करण्याचा सल्ला भारताला दिला होता.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केलेली असताना तालिबानचे अफगाणी लष्करावरील हल्ले तीव्र झाले आहेत. काही ठिकाणी तर अफगाणी लष्कराच्या जवानांनी तालिबानशी संघर्ष न करता, त्यांच्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या येत आहेत. तालिबान अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे समोर येत असताना, हा देश लवकरच तालिबानच्या ताब्यात जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या साथीने अफगाणी लष्कर तालिबानवर जोरदार हवाई हल्ले चढवून शेकडो तालिबानच्या शेकडो सदस्यांना ठार करीत आहे. या हवाई हल्ल्यांसाठी पाकिस्तान अमेरिकेला आपली हवाई हद्द वापरू देत आहे. यामुळे खवळलेल्या तालिबानने पाकिस्तानला गंभीर परिणामांचे इशारे दिले आहे.

तालिबानवरील हल्ल्यांसाठी अमेरिकेला हवाई हद्द देणार्‍या पाकिस्तानात सध्या अमेरिकेला लष्करी तळ द्यायचा की नाही, यावर चर्चा सुरू आहे. वरकरणी पाकिस्तान अमेरिकेला तळ देणार नाही, असे सांगत असला तरी प्रत्यक्षात पाकिस्तानने तसा निर्णय घेतल्याचे दावे पाकिस्तानचीच माध्यमे करीत आहेत. काही पाकिस्तानी पत्रकारांनी आपल्या देशाचे सरकार तालिबानचा विश्‍वासघात करीत असल्याची खंत व्यक्त केली आहे. यामुळेच भारताच्या तालिबानबरोबरील कथित चर्चेची बातमी लक्षवेधी ठरते.

तालिबान ही एकजिनसी संघटना नाही. त्यात अनेक गटतट आहेत. यापैकी मुल्ला बरादर याच्याशी भारत चर्चा करीत असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी भारत तालिबानच्या इतर गटांशीही संपर्कात असल्याचे सदर बातमीत नमूद करण्यात आले आहे. तालिबानमधील हक्कानी नेटवर्क हा गट पाकिस्तानचा समर्थक व कट्टर भारतविरोधी म्हणून ओळखला जातो. या गटामुळेच भारत तालिबानकडे दहशतवादी संघटना म्हणून पाहत आला आहे. हक्कानी नेटवर्कच्या सदस्यांनी अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ले चढविले होते.

पण गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भूमिकेत बदल झाल्याचे संकेत तालिबानकडून दिले जात आहेत. अफगाणिस्तानची सत्ता हाती आल्यानंतर, आम्ही आपल्या देशाच्या भूमीचा वापर इतर देशांविरोधात होऊ देणार नाही, असे तालिबानने जाहीर केले होते. तालिबानच्या काही नेत्यांनी तर भारत अफगाणिस्तानात करीत असलेल्या गुंतवणुकीचे स्वागत करून पुढच्या काळातही भारत अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी अशीच गुंतवणूक करील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. काही पाकिस्तानी विश्‍लेषकही तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेवर आल्यानंतर भारताला दुखावणार नाही, असा दावा केला होता.

यामुळे भारताची तालिबानबाबतची भूमिका बदलू शकते, अशी चिन्हे दिसू लागली होती. पण अद्याप अधिकृत पातळीवर भारताने व तालिबाननेही या चर्चेच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण तालिबान भारताला अनुकूल भूमिका स्वीकारत असल्याचा आरोप करणार्‍या पाकिस्तानातील भारतद्वेष्ट्या पत्रकार व विश्‍लेषकांनी गेल्या काही आठवड्यांपासून तालिबानच्या विरोधात जहाल भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे. हा पाकिस्तान व तालिबानच्या कारस्थानाचा भाग आहे की खरोखरच तालिबानला भारताचे सहकार्य अपेक्षित आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र भारत तालिबानवर पूर्णपणे विश्‍वास ठेवून लोकनियुक्त अफगाणी सरकारच्या विरोधात जाण्याची फारशी शक्यता नाही. अफगाणिस्तानात संयुक्त सरकार स्थापन व्हावे व यासाठीचे प्रयत्न अफगाणींनीच करायला हवेत, अशी भारताची अपेक्षा आहे.

leave a reply