नवी दिल्ली – गेल्या काही वर्षात भारत- बांगलादेशमधील संबंध याआधी कधीही नव्हते इतके दृढ आणि बळकट झाले असल्याचे बांगलादेशचे रस्ते वाहतूक मंत्री ओबैदुल कादर यांनी म्हटले आहे. प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करून चीन बांगलादेशला आपल्या बाजूने खेचत असल्याचे दावे केले जातात. यापार्श्वभूमीवर कादर यांनी केलेले वक्तव्य महत्वाचे ठरते.
भारताकडून मिळालेल्या कर्ज साहाय्यावर सुरु असलेल्या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त रिवा गांगुली दास आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.
मागील काही काळात दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणि संपर्क अधिकच घट्ट झाले आहेत. त्यामुळे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यास मदत मिळेल, असे कादर यावेळी म्हणाले. दोन्ही देशांनी जमिनी सीमा आणि सागरी समस्यांवर तोडगा काढला आहे. इतर प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच दोन्ही देशांच्या मैत्री पूर्ण संबंधांचे प्रतीक ठरत असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला विशेष महत्त्व देण्यात यावे असे त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटले.
भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला गेल्याच महिन्यात बांगलादेशच्या दौरा केला होता. भारताच्या पंतप्रधानांनी परराष्ट्र सचिवांना बांगलादेश दौऱ्यावर पाठवून उभय देशांमधील संबंधाचे महत्त्व अधोरेखित केल्याचे पंतप्रधान हसिना यांनी यावेळी म्हटले होते. चीन बांगलादेशला आपल्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. चीन बांगलादेशमध्ये करीत असलेली गुंतवणुकीवरून चीनचा बांगलादेशवरील प्रभाव वाढत असल्याचे दावे केले जात होते. यापार्श्वभूमीवर कादर यांचे उद्गार महत्वाचे ठरतात.