चीनच्या इनर मंगोलियातील धोरणाविरोधात जपानमध्ये निदर्शने

टोकियो – जपानची राजधानी टोकियोमध्ये अनिवासी मंगोलियन नागरिकांनी चीन सरकारच्या विरोधात निदर्शने केली. चीनचा स्वायत्त प्रांत असलेल्या इनर मंगोलियातील शाळांमध्ये चीन सरकारकडून स्थानिक भाषेच्या जागी मँडरीन भाषा सक्तीची करण्यात आली आहे. या विरोधात अनिवासी इनर मंगोलियन नागरिकांकडून ही निदर्शने करण्यात आली.

इनर मंगोलियामध्ये गेल्या काही दिवसांपासून चीनच्या दडपशाहीविरोधात निदर्शने सुरू आहेत. तसेच चीनबाहेर अनिवासी मंगोलियन नागरिकांनी रस्त्यावर उतरून चीनच्या नव्या भाषा धोरणाचा निषेध करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी टोकियोमध्ये अनिवासी मंगोलियन नागरिकांनी चीनच्या विरोधात निदर्शने केली होती. त्यावेळी फार कमी संख्येने मंगोलियन उपस्थित होते. परंतु शनिवारी जपानच्या टोकियोमध्ये झालेल्या निदर्शनात हजारो अनिवासी मंगोलियन नागरिकांनी मास्क घालून चीनचा निषेध केला. या सर्वांनी चीनच्या विरोधात घोषणा दिल्या.

चीन आर्थिक, राजकीय व लष्करी बळाच्या जोरावर इनर मंगोलियातील शाळांमध्ये स्थानिक भाषा, मंगोलियन संस्कृती, पंरपरा नष्ट करून स्वतःची संस्कृती इथल्या जनतेवर जबरदस्तीने लादत आहे, असा आरोप इथली जनता करीत आहे.

leave a reply