भारत व भूतान पारंपरिक सहकार्य दृढ करणार

नवी दिल्ली – भूतानचे राजे ‘जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक’ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर, बुधवारी दोन्ही देशांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. उभय देशांमधील काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या संबंधांचा दाखला देऊन हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी पाच कलमी मुद्यांवर पंतप्रधान मोदी व भूतान राजे वांगचुक यांच्यात चर्चा पार पडली. याबाबतचे संयुक्त निवेदन बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. भारत व भूतानमधील पारंपरिक सहकार्याला आव्हान देऊन चीनने भूतानमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण राजे वांगचुक यांच्या या भारतभेटीनंतर चीनच्या या प्रयत्नांना यश मिळणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

भारत व भूतान पारंपरिक सहकार्य दृढ करणार२०१७ साली भारत, भूतान व चीनच्या सीमा भिडलेल्या डोकलाम भागात भारत व चीनचे लष्कर एकमेकांसमोर खडे ठाकले होते. भारतीय सैन्याने इथून माघार घ्यावी, यासाठी चीनने युद्धाच्या धमक्या देऊन पाहिल्या. पण त्याचा परिणाम भारतावर झाला नव्हता. यामुळे डोकलाममधील भूतानची भूमी बळकावण्याचा चीनचा डाव फसला होता. यानंतर चीनने भूतानच्या नेत्यांना हाताशी धरून भारताविरोधात वातावरण तयार करण्याचा कट आखला होता.

भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी तीन देशांची सीमा भिडलेल्या डोकलामबाबत बोलण्याचा चीनलाही समान अधिकार असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. भूतानसाठी चीन हा भारताइतकाच जवळचा देश असल्याचे संकेत याद्वारे भूतानच्या पंतप्रधानांनी दिले होते. यावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भूतान हा भारताचा निकटतम सहकारी देश असून भूतानचे परराष्ट्र व्यवहार १९७३ साली झालेल्या करारानुसार भारतच हातळत आहे. यामुळे पंतप्रधान लोटे शेरिंग यांचे विधान भारताने अतिशय गांभीर्याने घेतले होते.

त्या पार्श्वभूमीवर, भूतानचे राजे ‘जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक’ यांच्या भारतभेटीचे महत्त्व वाढले होते. राजे वांगचुक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा पार पडली. या चर्चेत भारत व भूतानचा परस्परांवरील विश्वास तसेच सहकार्य अधिकच व्यापक करण्यासंदर्भात पाच कलमी कार्यक्रमावर चर्चा झाली. आर्थिक सहकार्य व विकास, व्यापारी वाहतूक व गुंतवणूक विषयक सहकार्य, दोन्ही देशांची आर्थिक समृद्धी तसेच ऊर्जाविषयक सहकार्याचा आणि अंतराळ तसेच स्टार्टअप्स संदर्भातील सहकार्याचा यामध्ये समावेश आहे. तसेच आपल्या सीमेवर दोन्ही देशांची संयुक्त चौकी उभारण्यावरही पंतप्रधान मोदी व राजे वांगचुक यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली.

हिंदी English

 

leave a reply