अण्वस्त्रसज्ज युक्रेनवर रशियाने हल्ला चढविण्याचे धाडस केले नसते

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन

bill clinton yeltsinवॉशिंग्टन – ‘सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर युक्रेनने स्वत:कडील अण्वस्त्रांचा साठा रशियाला सुपूर्द करावा, यासाठी आपणच युक्रेनला तयार केले होते. तसे केले नसते तर आज रशियाने अण्वस्त्रसज्ज युक्रेनवर हल्ला चढविण्याचे धाडस केले नसते. त्यामुळे युक्रेनच्या आत्ताच्या परिस्थितीसाठी आपणच जबाबदार ठरतो’, अशी कबुली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी दिली.

१९९०च्या दशकात सोव्हिएत रशियाचे विभाजन झाल्यानंतर अण्वस्त्रांचा मुद्दा अतिशय वादग्रस्त ठरला होता. त्यावेळी बिल क्लिंटन यांनी रशियाचे तत्कालिन राष्ट्राध्यक्षबोरीस येल्तसिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष लिओनिड क्रावशूक यांच्या मध्यस्थी घडविली होती. तसेच युक्रेनने आपल्याकडील सर्व अण्वस्त्रे रशियाच्या हवाली करावी. रशिया या अण्वस्त्रांची विल्हेवाट लावील. या मोबदल्यात अमेरिका, रशिया आणि ब्रिटन युक्रेनला सुरक्षा पुरवतील, असे निश्चित झाले होते.

आयरीश वृत्तसंस्थेशी बोलताना माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी सुमारे चार दशकांपूर्वीच्या या मध्यस्थीचा उल्लेख केला. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना येल्तसिन-क्रावशूक यांच्यातील करार अजिबात मान्य नसल्याचा आरोपही क्लिंटन यांनी केला. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी १९९४ सालच्या या कराराचे उल्लंघन करुन सर्वप्रथम क्रिमिआचा ताबा घेतला, अशी टीका क्लिंटन यांनी केली.

दरम्यान, युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरणाऱ्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी रशियाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. युक्रेनला नाटोचा सदस्य करून घेण्याचे आमिष दाखवून अमेरिका व मित्रदेशांनी रशियाला चिथावणी दिली होती. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून अमेरिका व नाटो देश युक्रेनला आर्थिक व लष्करी सहाय्य करीत आहेत, याकडे क्लिंटन यांचे दुर्लक्ष झाल्याची टीका रशियाने केली आहे.

leave a reply