ब्रिटनच्या मंत्र्यांनी प्रवासी भारतीयांवर मारलेल्या शेऱ्यांमुळे भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापारी करार धोक्यात

मुक्त व्यापारी करार धोक्यातलंडन – ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर असताना बोरीस जॉन्सन यांनी येत्या दिवाळीत भारत व ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारी करार संपन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावेळी ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री असलेल्या लिझ ट्रुस आता ब्रिटनच्या पंतप्रधान बनल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात भारत व ब्रिटनमधील मुक्त व्यापारी कराराची शक्यता निकालात निघाल्याचे दावे केले जातात. ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री सुएला ब्रॅव्हरमन यांनी भारतीयांबाबत केलेल्या विधानांची तीव्र पडसाद उमटले असून यामुळे मुक्त व्यापारी करार धोक्यात आला आहे.

भारतीय वंशाच्या असलेल्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रॅव्हरमन यांनी भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करारामुळे येथे प्रवासी भारतीयांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा शेरा मारला होता. व्हिसाची मुदत संपल्यावरही ब्रिटनमध्ये वास्तव्य करणाऱ्यांमध्ये भारतीय सर्वात पुढे आहेत. हे कारण पुढे करून गृहमंत्री सुएला यांनी भारताबरोबरील मुक्त व्यापार कराराला विरोध केला. या मुद्यावर गृहमंत्री सुएला ब्रॅव्हरमन ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रुस यांच्याशी संघर्ष करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. भारताने ब्रिटनच्या गृहमंत्र्यांच्या विधानावर याआधीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या हवाल्याने माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या अहवालात ब्रिटनबरोबरील भारताचा मुक्त व्यापारी करार सध्या अडचणीत आल्याचा दावा करण्यात येत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान असलेल्या लिझ ट्रुस या व्यापारमंत्री व त्यानंतर परराष्ट्रमंत्री असताना भारत व ब्रिटनमध्ये हा करार व्हावा यासाठी पाठपुरवठा करीत होत्या. मात्र त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत हा करार अडचणीत आला असून एफटीएसंदर्भात सुरु असलेल्या चर्चा थांबल्या आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत हा करार आता होणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पुढेमागे हा करार संपन्न झाला तरी बोरीस जॉन्सन े ब्रिटनचे पंतप्रधान असताना, जितका हा करार व्यापक करण्यावर एकमत झाले होते, तितक्या प्रमाणात हा करार मोठा नसेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय हा करार आता पुढे सरकण्यासाठी काही वेळ जावा लागेल, असे माध्यमांचे म्हणणे आहे. काही व्यक्तींमुळे भारत आणि ब्रिटनमधील एफटीए करारावरील चर्चा रखडल्याची नाराजी ब्रिटनच्या माध्यमांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक्झिट अर्थात युरोपिय महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर, भारतासारख्या नव्या बाजारपेठेत आपल्याला संधी मिळावी, यासाठी ब्रिटन प्रयत्न करीत आहे. तसेच कोरोनानंतर मंदावलेल्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला भारताकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. यासाठी पावले टाकत असलेल्या ब्रिटनला अंतर्गत राजकारणाचा फटका बसला असावा व यातूनच गृहमंत्री सुएला यांनी भारतविरोधी विधाने केली असावी, अशी शक्यता समोर येत आहे.

leave a reply