भारत लवकरच स्टेल्थ पाणबुड्यांची निर्मिती करणार

नवी दिल्ली – ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १०१ संरक्षण साहित्याच्या खरेदीला मंजुरी दिल्यानंतर संरक्षण मंत्रालय लवकरच भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण मंत्रालय बहुप्रतिक्षित ‘प्रोजेक्ट पी-७५ आय’ या सुमारे ४२ हजार कोटींच्या सहा स्टेल्थ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी निविदा काढणार आहे. पुढच्या महिन्यात यासंबंधी निर्णय जाहीर केला जाऊ शकतो, असा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये भारताने हिंदी महासागर क्षेत्रातील सुरक्षेला दिलेले प्राधान्य लक्षात घेता, हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.

भारत लवकरच स्टेल्थ पाणबुडींची निर्मिती करणारभारताची सागरी किनारपट्टी साडे सात हजार किलोमीटर पसरलेली असून या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाला अत्याधुनिक पाणबुड्यांची आवश्यकता असल्याची मागणी गेली काही वर्षे केली जात आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या चीनकडे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे नौदल आहे. या चीनच्या नौदलात ७९ पाणबुड्या असून गेल्या काही वर्षांपासून सदर पाणबुड्यांची हिंदी महासागर, बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्र, या भारतीय सागरी क्षेत्रातील गस्त वाढली आहे. या व्यतिरिक्त चीन पाकिस्तानला आठ पाणबुड्या पुरविणार आहे. तर भारतीय नौदलाच्या ताफ्यात १७ पाणबुड्या आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाला अत्याधुनिक पाणबुड्यांनी सज्ज करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती.

गेल्या काही आठवड्यांपासून चीनबरोबरचा तणाव वाढल्यानंतर भारताने आपल्या संरक्षण सज्जतेचा वेग वाढविला असून नौदलाच्या मागण्यांनाही मंजुरी मिळत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय नौदलाकडून स्टेल्थ पाणबुड्यांची केली जाणारी मागणीही मार्गी लागणार असल्याचे बोलले जाते. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत या पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी पुढच्या महिन्यात निविदा काढल्या जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतील ‘माझगाव डॉक्स लिमिटेड’ आणि ‘एल अँड टी’ या खासगी कंपन्यांना पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी आमंत्रित केले जाईल. सरकारने लागू केलेल्या ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ धोरणा अंतर्गत या पाणबुड्यांची निर्मिती केली जाईल.

या धोरणा अंतर्गत सदर पाणबुड्यांच्या निर्मितीत भारतीय कंपन्यांना ‘ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्चरर’ म्हणून परदेशी कंपनीचे सहाय्य मिळणार आहे. यासाठी पाच परदेशी कंपन्यांची नावे निवडण्यात आली आहेत. यामध्ये रशिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि दक्षिण कोरियन कंपन्यांचा समावेश आहे. या पाणबुड्यांच्या निर्मितीची सर्वाधिक जबाबदारी असलेल्या भारतीय कंपन्यांकडून एका परदेशी कंपनीची निवड केली जाईल, असे बोलले जाते. भारतीय नौदल याआधीपासून रशिया आणि फ्रान्सच्या बनावटीच्या पाणबुड्यांनी सज्ज आहेत. भारताने फ्रान्ससोबत केलेल्या करारानुसार, चार स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्या २०२२ सालापर्यंत नौदलात सहभागी होतील. तर भारतीय नौदल लवकरच सहा आण्विक पाणबुड्यांनी सज्ज होणार आहे. या व्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या चार पाणबुड्या देखील भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहेत.

leave a reply