इस्लामाबाद – भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू जलवाटप कराराचे भारताला एकतर्फी उल्लंघन करता येणार नाही, असा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या हवामान बदलविषयक विभागाच्या मंत्री शेरी रेहमान यांनी भारताला हा इशारा दिला. त्याचवेळी भारताने या करारात फेरबदल करण्याचा दिलेला प्रस्ताव सुस्पष्ट नसल्याचा शेरा देखील शेरी रेहमान यांनी मारला. मात्र पाकिस्तानी संसदेत यासंदर्भातील चर्चेत बोलताना, रेहमान यांनी सिंधू जलवाटप करारात पाकिस्तानला खूपच अधिक पाणी मिळत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले.
25 जानेवारी रोजी भारताने पाकिस्तानला सिंधू जलवाटप करारासंदर्भात नोटीस बजावली होती. या कराराचा फेरआढावा घेण्याची गरज असल्याचे भारताने पाकिस्तानला कळविले होते. हा करार तब्बल सहा दशकांपूर्वी झाला होता व त्यात काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता असल्याचे भारताने म्हटले होते. पण वारंवार यासंदर्भात चर्चेची मागणी करूनही पाकिस्तानला त्याला प्रतिसाद द्यायला तयार नाही, त्यामुळे आम्ही यासंदर्भात एकतर्फी निर्णय घेऊ शकतो, असे भारताने बजावले होते.
सिंधू जलवाटप करारावरील भारताच्या चिंता विचारात घेण्यास आम्ही तयार आहोत, असे दावे पाकिस्तानने केले होते. हवामानबदल विषयक विभागाच्या मंत्री शेरी रेहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यावर निवेदन करताना, भारताने या कराराबाबत दिलेला इशारा गंभीर असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धाच्या काळातही हा करार अबाधित राहिला होता, याकडे रेहमान यांनी लक्ष वेधले. पण आत्ताच्या काळात भारताची भूमिका बदलत असल्याची नोंद करून रेहमान यांनी या करारात भारताला एकतर्फी बदल करता येणार नाही, त्यासाठी पाकिस्तानला विचारात घ्यावेच लागेल, असे म्हटले आहे.
भारताच्या पाकिस्तानविषयक धोरणात आक्रमक बदल झाले आहेत आणि पाकिस्तानची सध्याची अवस्था याला जबाबदार असल्याचा दावा काही संसद सदस्यांनी केला. पाकिस्तानात राजकीय अस्थैर्य माजले असून राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता उरलेली नाही. याचा फायदा घेण्याची तयारी भारताने केलेली आहे. म्हणूनच पाकिस्तानने भारताच्या कारवायांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे या संसद सदस्यांनी सिंधू जलवाटप करारावरील चर्चेत म्हटले होते.
हिंदी English