तवांगच्या सीमेवरील तणाव वाढलेला असतानाच लडाखच्या एलएसीवर भारत व चीनच्या लष्कराची चर्चा

लष्कराची चर्चानवी दिल्ली/वॉशिंग्टन – अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात चीनच्या घुसखोरीमुळे तणाव वाढलेला असतानाच, लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा पार पडली. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करामध्ये पार पडलेली ही चर्चेची 17 फेरी ठरते. यातून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. या चर्चेची बातमी येत असताना, भारत व अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांच्या चर्चेती बातमी समोर आली आहे. या चर्चेत भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान आणि अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख मार्क मिले यांनी उभय देशांमधील क्षेत्रिय व जागतिक पातळीवरील सुरक्षाविषयक सहकार्य व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील एलएसीजवळ भारत व अमेरिकेच्या लष्कराचा संयुक्त युद्धसराव पार पडला होता. या युद्धसरावावर चीनने आक्षेप घेऊन भारताने चीनबरोबर केलेल्या सीमाकराराचे उल्लंघन या युद्धसरावामुळे झाल्याचे म्हटले होते. या आक्षेपाला भारत तसेच अमेरिकेनेही उत्तर दिले. सदर युद्धसरावामुळे कुठल्याही स्वरुपाच्या कराराचा भंग होत नसल्याचे भारताने म्हटले होते. मात्र या युद्धसरावानंतर चीनच्या लष्कराने तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैनिकांनी चीनच्या जवानांना वेळीच रोखून हा घुसखोरीचा प्रयत्न उधळला. यावर भारतात चर्चा सुरू असतानाच, दोन्ही देशांच्या लष्करामध्ये लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चा पार पडली.

लष्कराची चर्चादोन्ही देशांमधील चुशूल-मॉल्दो सीमेवर ही चर्चा पार पडली. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चेची ही 17 फेरी ठरते. मात्र 20 डिसेंबर रोजी पार पडलेल्या या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झालेले नाही. सीमावाद वाटाघाटींच्या मार्गाने सोडविण्याचे दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याआधी पार पडलेल्या चर्चेच्या फेऱ्यानंतर अशाच स्वरूपाचे सूर लावण्यात आले होते.

दरम्यान, भारत व चीनमधील तणाव वाढत असतानाच, भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान व अमेरिकेचे संरक्षणदल प्रमुख जनरल मार्क मिले यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ही चर्चा दोन्ही देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचा दावा केला जातो. खुले व मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते व भारत या क्षेत्रातील प्रमुख शक्ती आहे, असा दावा यावेळी जनरल मिले यांनी केला. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अस्थैर्य, असमतोल व असुरक्षितता वाढण्यामागे चीनच्या विस्तारवादी कारवाया असल्याचे अमेरिकेने अप्रत्यक्षरित्या तसेच थेट आरोप केले होते. अशा स्थितीत भारत हा या क्षेत्राच्या स्थैर्यासाठी योगदान देणारा देश असल्याचे सांगून अमेरिका भारताच्या या क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करीत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या संरक्षणदलांकडून भारताबरोबरील सहकार्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात येत आहे. अमेरिकेने सामरिक पातळीवरील भारताचे महत्त्व नीट जाणून घ्यावे आणि भारताबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी योजनाबद्ध पावले टाकावी, अशी मागणी अमेरिकन संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

leave a reply