चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग ही अतिशय चिंताजनक बाब

- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाचा वाढता संसर्गजीनिव्हा/बीजिंग – चीनमधील कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने पसरत असल्याचे अहवाल समोर येत असून ही अतिशय चिंताजनक बाब ठरते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी दिला. हॉस्पिटलमध्ये दाखल होणारे रुग्ण व ‘आयसीयू’मधील स्थिती याबाबत चीनने अधिक माहिती द्यायला हवी, असेही ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी बजावले आहे. बुधवारी चीनमध्ये तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती ‘नॅशनल हेल्थ कमिशन’कडून देण्यात आली. मात्र प्रत्यक्षातील रुग्णांची संख्या अनेक पटींनी जास्त असल्याचा दावा सोशल मीडियावरील विविध पोस्टस्‌‍मध्ये करण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता संसर्गतीन वर्षापूर्वी, 2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरात कोरोनाच्या साथीची सुरुवात झाली होती. त्यानंतर वर्षभरातच ही साथ आटोक्यात आणल्याचे दावे चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून करण्यात आले होते. मात्र हे दावे सपशेल खोटे ठरले असून 2021पासून चीनमध्ये कोरोनाच्या नव्या उद्रेकांना सुरुवात झाली. यावर मात करण्यासाठी अत्यंत कठोर अशी ‘झीरो कोविड पॉलिसी’ लागू करून कोट्यावधी नागरिकांना घरात बंदिस्त करण्यात आले. मात्र त्यानंतरही चीनमधील उद्रेक थांबले नाहीत. उलट कोरोना निर्बंधांविरोधात जनता रस्त्यावर उतरल्याने या महिन्याच्या सुरुवातील कम्युनिस्ट राजवटीला ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

मात्र हा निर्णय घेताना कम्युनिस्ट राजवट व स्थानिक यंत्रणांनी पुरेशी काळजी न घेतल्याने चीनमध्ये कोरोनाचा नवा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसात राजधानी बीजिंग व शांघायसह देशाच्या अनेक भागांमध्ये रुग्णसंख्येचा स्फोट होताना दिसत आहे. शहरांमधील हॉस्पिटल्स तसेच तात्पुरत्या काळासाठी उभी करण्यात आलेली रुग्णालये भरून गेली आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांना बेड शेअर करावे लागत आहेत. काही रुग्णालयांमध्ये संसर्ग झालेले रुग्ण व मृतदेह जवळजवळ ठेवल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्गबीजिंगसह काही शहरांमधील दफनभूमींमध्ये जागा राहिली नसून मृतदेह बाजूला ठेवण्यात आले आहेत. मात्र चिनी यंत्रणा या सर्व बाबी पुन्हा एकदा लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या विविध पोस्टस्‌‍मधून चिनी यंत्रणांचा खोटेपणा सिद्ध होत असून याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने इशारा देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकाऱ्यांनी चीनबाबत चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आवाहन केले आहे. हा वर्ग कोरोनाच्या साथीत सर्वाधिक लक्ष्य ठरल्याची जाणीवही करून देण्यात आली.

दरम्यान, चीनमधील परदेशी अधिकाऱ्यांसाठी प्रथमच परदेशी लस आयात करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले आहे. जर्मनीच्या ‘बायोन्टेक’ कंपनीने तयार केलेली लस चीनला पाठविण्यात आली आहे. लसीचे 11,500 डोस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. चीनने यापूर्वी परदेशी लस वापरण्यास स्पष्ट नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर जर्मन लस चीनमध्ये दाखल होणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply