लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमधील चर्चेची 16वी फेरीही अपयशी ठरली

चर्चेची 16वी फेरीनवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमध्ये पार पडलेली चर्चेची 16वी फेरी देखील निष्फळ ठरली. दोन्ही देशांच्या लष्कराने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून चर्चेची ही प्रक्रिया पुढेही सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. चीनच्या सरकरी वर्तमानपत्राने मात्र ही चर्चा अतिशय सकारात्मक असल्याचे दावे करून, भारत व चीनने पाश्चिमात्यांचा विघातक परिणाम आपल्या संवादावर होऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे. तर या चर्चेच्या बातम्या येत असतानाच, चीनने लडाखच्या पँगाँग सरोवर क्षेत्राजवळ युद्धसराव केल्याचे व्हिडिओज्‌‍ प्रसिद्ध केले आहेत.

चीनने लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रातून संपूर्ण माघार घ्यावी, ही भारताची मागणी मान्य करण्यास चीन तयार नाही. चीनने तसे केल्याखेरीज एलएसीवरील तणाव कमी होणार नाही, या आपल्या मागणीवर भारत ठाम आहे. दोन्ही देशांनी स्वीकारलेल्या या ठोस भूमिकेमुळे चर्चेच्या 16 व्या फेरीतूनही काही हाती लागले नाही. दोन्ही देशाच्या लष्कराने सकारात्मक वातावरणात ही चर्चा पुढेही सुरू ठेवून सामोपचाराने वाद मिटविण्याची घोषणा केली आहे. या या चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ही बाब नमूद करण्यात आली. चर्चेच्या 15 व्या फेरीनंतरही अशाच स्वरुपाचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते.

आत्तापर्यंत भारताच्या मागणीनुसार चीनने लडाखच्या पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडील तीरावरून व गोग्रा येथून माघार घेतलेली आहे. पण चँग चेन्मो सेक्टरमधील कुग्रांग नाल्याजवळ अजूनही चीनचे जवान तैनात आहेत. या ठिकाणाहूनही चीनच्या जवानांनी माघार घ्यावी व आधी होती तशी स्थिती प्रस्थापित करावी, असे भारताचे म्हणणे आहे. मात्र या ठिकाणाहून माघार घेणे आपल्या प्रतिष्ठेसाठी हानीकारक ठरेल, असे चीनला वाटत आहे. म्हणूनच चीन भारताची ही मागणी मान्य करायला तयार नाही. पण त्याखेरीज चीनसमोर दुसरा पर्याय नाही, अन्यथा दोन्ही देशांमधील संबंध असेच ताणलेले राहतील, याची जाणीव भारत चीनला करून देत आहे.

भारताचे म्हणणे मान्य न केल्याची फार मोठी आर्थिक किंमत चीनला चुकती करावी लागत आहे. भारताने चीनची उत्पादने व कंपन्यांवर कडक कारवाई करून निर्बंध लादण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. त्याचवेळी गलवानच्या संघर्षानंतर खवळलेल्या भारतीयांनी चिनी उत्पादनांकडे पाठ फिरविण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाची साथ, युक्रेनचे युद्ध व त्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात जगभरातील प्रमुख देशांमध्ये फार मोठी बाजारपेठ असलेल्या भारताशी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र चीन या स्पर्धेत खूपच मागे पडला आहे. ही आर्थिक किंमत मोजून चीन लडाखच्या एलएसीवर तणाव कायम ठेवणारी पावले उचलत आहे.

मंगळवारीही चीनने पँगाँग सरोवर क्षेत्राजवळ युद्धसराव केल्याचे व्हिडिओज्‌‍ आपल्या सरकारी माध्यमांवर प्रसिद्ध केले. चीन भारतासमोर झुकलेला नाही, हे दाखविण्यासाठी या देशाची ही सारी धडपड सुरू असल्याचे दिसते.

leave a reply