युक्रेनमधील शस्त्रास्त्रांची तस्करी इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक

- अमेरिकन जर्नलचा इशारा

तस्करीकिव्ह – रशियाविरोधी युद्धासाठी अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला केला जाणारा शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणातील पुरवठा (ओव्हरफ्लो) ‘टाईम बॉम्ब’मध्ये रुपांतरीत होत आहे. पाश्चिमात्य देश आणि युक्रेनच्या यंत्रणेचे या शस्त्रास्त्रांवर नियंत्रण नसल्यामुळे यातील शस्त्रास्त्रांची जगभरातील काळ्या बाजारात तस्करी सुरू आहे. सदर शस्त्रास्त्रे इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या हाती लागली तर त्याने इस्रायलचीच सुरक्षा धोक्यात येईल, असा इशारा अमेरिकन जर्नलने दिला आहे.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यांवर टीका करून अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला लष्करी मदत सुरू केली आहे. गेल्या साडेचार महिन्यांच्या या संघर्षात एकट्या अमेरिकेने युक्रेनला 7.3 अब्ज डॉलर्सची लष्करी मदत केली. तर बायडेन प्रशासन लवकरच युक्रेनसाठी 40 कोटी डॉलर्सच्या लष्करी सहाय्यावर स्वाक्षरी करणार आहेत.

पण युक्रेनला पुरविण्यात येणाऱ्या या लष्करी मदतीवर अमेरिकेतूनच ताशेरे ओढले जात आहेत. अमेरिका व पाश्चिमात्य देश युक्रेनला प्रमाणापेक्षा अधिक लष्करी मदत करीत असल्याची टीका ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन दैनिकानेच काही दिवसांपूर्वी केली होती. तर युक्रेनच्या यंत्रणा पाश्चिमात्य देशांकडून मिळणाऱ्या या लष्करी सहाय्याचा मागमूस ठेवू शकत नसल्याचा दावा स्टिमसन सेंटर या अमेरिकन अभ्यासगटाने केला होता.

तस्करीयुक्रेनसाठी पाठविलेली शस्त्रास्त्रे तस्करांच्या हाती सापडत आहेत, याची दखल युरोपिय महासंघाने देखील घेतली आहे. ही तस्करी रोखण्यासाठी महासंघाने युक्रेनच्या शेजारी मोल्दोवा येथे स्वतंत्र केंद्र उभारणार आहे. यामुळे युक्रेनमधील शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यात सहाय्य मिळेल, असा दावा महासंघ करीत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये फिरत असलेल्या व्हिडिओज्‌‍चा हवाला देऊन ‘युरेशिया रिव्ह्यूज्‌‍’ या अमेरिकन जर्नलने इशारा प्रसिद्ध केला.

युक्रेनमध्ये दाखल झालेली लष्करी मदत युरोपिय देशांमार्गे काळ्या बाजारात पोहोचत आहे. यामध्ये रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, असॉल्ट रायफल्स यासारखी काही प्रगत शस्त्रास्त्रे व्हिडिओज्‌‍मध्ये दिसत असल्याचे अमेरिकन जर्नलने लक्षात आणून दिले. तर एका व्हिडिओमध्ये स्मगलरने काळ्या बाजारातून या शस्त्रास्त्रांची सहजरित्या आणि कमी किंमतीत खरेदी करता येत असल्याचे म्हटले आहे. याचा हवाला देऊन अमेरिकन जर्नलने युक्रेनमधील लष्करी मदतीचा ओव्हरफ्लो इस्रायलसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा दिला.

विध्वंसक हेतू असणारे गटच काळ्या बाजारातून सहजरित्या मिळणाऱ्या या पाश्चिमात्य बनावटीची शस्त्रास्त्रे खरेदी करू शकतात. यामध्ये ‘आयएस’, ‘हयात तहरिर अल-शाम’ आणि इतर दहशतवादी संघटनांचा समावेश असू शकतो, असा दावा अमेरिकन जर्नलने केला. तसेच तुर्कीच्या लष्करी कारवाईला उत्तर देण्यासाठी सिरियन कुर्द आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी ही शस्त्रास्त्रे खरेदी करतील, याकडे या जर्नलने लक्ष वेधले.

युक्रेनमधून तस्करी होणारी अमेरिका व पाश्चिमात्य देशांची शस्त्रास्त्रे सिरियासह गाझापट्टीत देखील पोहोचू शकतात. असे झाले तर यापुढील इस्रायलबरोबरच्या संघर्षात गाझातील दहशतवादी संघटना पाश्चिमात्य बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून इस्रायलला धक्के देऊ शकतात, असे अमेरिकन जर्नलने बजावले आहे.

leave a reply