आठ महिन्यात पहिल्यांदाच ‘जीएसटी’ महसूल एक लाख कोटींच्या पुढे

नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये पहिल्यादांच देशाचा ‘जीएसटी’ महसूल एक लाख कोटींच्या पुढे गेला आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ‘जीएसटी’च्या महसूलात १० टक्के इतकी लक्षवेधी वाढ झाली आहे.

महसूल

कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन करावे लागले होते. त्यानंतर सर्व उद्योग व्यवहार ठप्प झाल्याने ‘जीएसटी’ महसूल कमी झाला होता. ‘जीएसटी’ महसूल घटल्याने राज्यांना ‘जीएसटी’चा महसुली वाटा देण्यासही केंद्र सरकारला शक्य झाले नव्हते. महसुलातील ही घट केंद्र सरकारसाठी चिंता वाढविणारी ठरली होती.

मात्र जुलैपासून केंद्र सरकारने ‘अनलॉक’अंतर्गत लॉकडाऊनच्या काळातील निर्बंधात शिथिलता वाढविण्यास सुरुवात केली. रोजच्या व्यवहारांसाठी सवलती देण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात हे नियम अधिकच शिथिल करण्यात आले. त्याचवेळी लॉकडाऊनमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. याचा परिणाम दिसू लागला आहे.

सरकारने घोषित केलेली माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात ८० लाख ‘जीएसटी‘ रिटर्न दाखल झाले. तसेच १ लाख ५ हजार १५५ कोटी रुपयांचा ‘जीएसटी’ महसूल गोळा झाला. यामध्ये ‘सीजीएसटी’ १९ हजार १९३ कोटी रुपयांचा असून ”एसजीएसटी’ २५ हजार ४११ कोटी रुपयांचा आहे. तसेच ‘आयजीएसटी’ ५२ हजार ५४० कोटी रुपयांचा आहे. ‘आयजीएसटी’मधील २३ हजार ३७५ कोटी हे आयातीवर आकारलेल्या करातून प्राप्त झाले आहेत.

महसूल

गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत ‘जीएसटी’ महसूलात १० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये आयात मालाद्वारे मिळालेला ‘जीएसटी’ महसूल ९ टक्के जास्त आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ‘जीएसटी’ महसूलाचा वृद्धीदर अनुक्रमे उणे १४, उणे ८ आणि ५ टक्के राहिला आहे. सर्वात जास्त जीएसटी महाराष्ट्रातून मिळाला आहे. महाराष्ट्रातून १५ हजार ७९९ कोटी रुपयांचा ‘जीएसटी’ महसूल मिळाला. तर त्यानंतर कर्नाटकातून ६,९९८ कोटी रुपये, तामिळनाडूमधून ६,९०१ कोटी रुपये आणि उत्तरप्रदेशातून ५ हजार ४७१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

महसुलात होत असलेली वाढ अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी परतत असल्याचे दाखवून देत आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अर्थचक्र पुन्हा रुळावर येत असल्याचे हे संकेत आहेत. तसेच उत्सव काळ असल्याने नोव्हेंबर महिन्यातही महसूल वाढेल असे सांगताना त्यानंतरच्या काळात ही स्थिरता कायम राहणे आवश्यक आहे, असे विश्लेषकांनी बजावले आहे.

leave a reply