चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर भारतावर सर्व आघाड्यांवरून हल्ला होऊ शकतो

- वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांचा इशारा

नवी दिल्ली – भारताची धोरणात्मक उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या मार्गात चीन हा सर्वात मोठा व दीर्घकालिन धोका असल्याचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी बजावले आहे. त्याचवेळी चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांकडून वाढविण्यात येणार्‍या संरक्षणक्षमतांचा उल्लेख करीत, भारतावर सर्व आघाड्यांवरून हल्ला होऊ शकतो, असा इशाराही एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिला. भारताचे सुरक्षाविषयक धोरण अस्थिर शेजारी देश व न सुटलेले सीमावाद यांनी प्रभावित झालेले असून त्यावरूनच संघर्षाची ठिणगी उडू शकते, याकडेही वायुसेनाप्रमुखांनी लक्ष वेधले.

चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर भारतावर सर्व आघाड्यांवरून हल्ला होऊ शकतो -वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांचा इशारा‘सेंटर फॉर एअर पॉवर स्टडिज्’(कॅप्स) या अभ्यासगटाने आयोजित केलेल्या १८व्या सुब्रतो रॉय सेमिनारमध्ये बोलताना व्ही. आर. चौधरी यांनी चीनच्या कारवायांचा उल्लेख केला. ‘चीनकडून आंतरराष्ट्रीय तसेच क्षेत्रीय स्तरावर प्रभाव वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातून चीन व भारतामधील स्पर्धा अधिकच वाढू शकते. चीनकडून भारताला सीमावादाच्या मुद्यांवर अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भारताच्या सीमांजवळ, तिबेटमध्ये चीनच्या हवाईदलाकडून मोठ्या प्रमाणावर तळांची उभारणी तसेच तैनाती करण्यात येत आहे. ही बाब चीनची आक्रमकता दाखवून देणारी ठरते’, असा इशारा वायुसेनाप्रमुखांनी दिला.

चीनबरोबरच पाकिस्तानही हवाईसज्जता वाढवित असल्याकडे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी लक्ष वेधले. असे असले तरी भारताला सर्वाधिक धोका चीनकडूनच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्‍चिमेपेक्षा पूर्व भागातील शेजार्‍याकडून असलेल्या धोक्याची तीव्रताच अधिक असल्याचेही वायुसेनाप्रमुख म्हणाले. भविष्यात भारतावर सर्व आघाड्यांवरून हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

त्यात आर्थिक कोंडी, राजनैतिक पातळीवर वेगळे पाडण्याचा प्रयत्न, सायबरहल्ले यांचा वापर शत्रूकडून होऊ शकतो, असेही एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी बजावले. नजिकच्या काळात भारतीय हवाईदलाचे वेगाने आधुनिकीकरण करण्याची गरज असून क्षमतांमध्येही भर टाकणे महत्त्वाचे आहे, याची जाणीवही त्यांनी करून दिली.

leave a reply