संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

- पत्नी मधुलिका यांच्यासह संरक्षणदलांचे ११ अधिकारीही मृत्यूमुखी

नवी दिल्ली/कुन्नूर – संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह संरक्षणदलांचे ११ अधिकारी तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. जनरल रावत तामिळनाडूच्या लष्करी तळावर व्याख्यान देण्यासाठी जात असताना हा हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातात एक अधिकारी बचावले असून त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू - पत्नी मधुलिका यांच्यासह संरक्षणदलांचे ११ अधिकारीही मृत्यूमुखी२२ नोव्हेंबर १९६३ साली जम्मू-काश्मीरच्या पूंछ येथे पाहणीसाठी जात असलेल्या वायुसेनेच्या हेलिकॉप्टरचा अपघात होऊन त्यात चार लष्कराचे व दोन वायुसेनेचे अधिकारी बळी पडले होते. यामध्ये लेफ्टनंट जनरल पदावरील दोन अधिकार्‍यांचा समावेश होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची हत्या याच दरम्यान झाल्याने भारतातील या दुर्घटनेकडे जगभरात प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्यानंतर हेलिकॉप्टर अपघातात इतक्या मोठ्या संख्येने देशाच्या संरक्षणदलांचे अधिकारी गमावण्याची ही दुसरी घटना ठरते.

जनरल रावत वायुसेनच्या ‘एमआय-१७व्ही५’ हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होते. कोईंबतूरच्या सुलूर येथील वायुसेनेच्या तळावरून हे हेलिकॉप्टर निघाले होते. तामिळनाडूच्या वेलिंग्टन येथील लष्करी कॉलेजमध्ये दुपारी २.४५ मिनिटंनी जनरल रावत व्याख्यान देणार होते. मात्र अप्पर कुन्नूर येथून प्रवास करीत असताना, या हेलिकॉप्टरचा यंत्रणेशी संपर्क तुटला. कुन्नूरच्या घनदाट जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळले. कोसळल्यानंतर या हेलिकॉप्टरने पेट घेतला. यावेळी उसळेला आगडोंब पाहून स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. पण आगीच्या तीव्रतेमुळे या हेलिकॉप्टरमधून स्थानिक कुणालाही बाहेर काढू शकले नाहीत.

याची माहिती मिळताच, तातडीने या ठिकाणी लष्कराचे पथक पोहोचले. हेलिकॉप्टरला लागलेली आग विझवून जनरल रावत व त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह इतर अधिकार्‍यांना तातडीने वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी जनरल रावत यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली. सारा देश या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करीत असून जनरल रावत यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू - पत्नी मधुलिका यांच्यासह संरक्षणदलांचे ११ अधिकारीही मृत्यूमुखीराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतमातेने आपला शूर सुपूत्र गमावला आहे व त्यांच्या अकाली जाण्याने आपल्याला फार मोठा धक्का बसल्याची भावपूर्ण प्रक्रिया दिली. गेल्या चार दशकांपासून भारतमातेची निस्वार्थपणे सेवा करणारे जनरल रावत हे महान नायक होते, असे राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ‘असामान्य योद्धा, सच्चे देशभक्त असलेल्या जनरल रावत यांनी संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणासाठी अफाट योगदान दिले. धोरणात्मक मुद्यांवर त्यांचा दृष्टीकोन व याबाबतची अंतर्दृष्टी थक्क करणारी होती. देश त्यांची असमान्य पातळीवरील सेवा कधीही विसरणार नाही’, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनरल रावत यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी जनरल रावत यांच्या जाण्याने संरक्षणदलांची व देशाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे म्हटले आहे. जनरल रावत यांनी देशासाठी दिलेले योगदान शब्दात कथन करता येणार नाही, असे सांगून केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जनरल रावत यांच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्‍वभूमीवर सायंकाळी ६.३० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिगटाच्या सुरक्षाविषयक बैठकीचे आयोजन करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीचे तपशील समोर आलेले नाहीत. पण संरक्षणदलप्रमुखांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply