उत्तर कोरियाकडून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

आंतरखंडीय बॅलेस्टिकसेऊल – उत्तर कोरियाने गुरुवारी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. याद्वारे उत्तर कोरियाने जपान, दक्षिण कोरिया या आपल्या शेजारी देशांसह अमेरिकेला इशारा दिल्याचा दावा केला जातो. २०१७ सालानंतर पहिल्यांदा उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे दक्षिण कोरिया लक्षात आणून देत आहे.

उत्तर कोरियाच्या लष्करी हालचालींवर बारीक नजर ठेवणार्‍या दक्षिण कोरिया आणि जपानच्या लष्कराने या चाचणीची माहिती प्रसिद्ध केली. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगँगजवळच्या सुनान भागातून हे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले. या क्षेपणास्त्राने जवळपास ६,२०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रवास केल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. यानंतर दक्षिण कोरियाने देखील आपल्या तीनही संरक्षणदलांना क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केले. यामुळे कोरियन क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता.

काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीची घोषणा केली होती. यावर संतापलेल्या उत्तर कोरियाने ही चाचणी घेतल्याचा दावा केला जातो. अमेरिका व मित्रदेशांनी आपल्यावरील निर्बंध मागे घ्यावे, अशी मागणी उत्तर कोरियाने याआधी केली होती. आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याची दखल घ्यावी, यासाठी उत्तर कोरियाने ही चाचणी केल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अमेरिकेत बायडेन यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमध्ये वाढ झाल्याचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीतील उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांची तीव्रता वाढली आहे.

leave a reply