भारत-इजिप्त धोरणात्मक भागीदारी विकसित करणार

पंतप्रधान मोदी यांची घोषणा

Egyptian President's ceremonial receptionनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर आलेले इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. यानंतर भारत व इजिप्तने आपले संबंध धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर नेण्याचा निर्धार केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तसेच भारत आणि इजिप्तमध्ये सांस्कृतिक क्षेत्र, आयटी, सायबर सुरक्षा, युवावर्ग तसेच माध्यमांशी निगडीत क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे सहकार्य करार संपन्न झाले आहेत. याबरोबरच दोन्ही देशांनी पुढच्या पाच वर्षात द्विपक्षीय व्यापार 12 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

बुधवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध, अन्नधान्य आणि खतांची टंचाई व जगासमोर खडे ठाकलेले ऊर्जासंकट, हे या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे होते, अशी माहिती दिली जाते. याबरोबरच सीमेपलिकडून निर्यात केल्या जाणाऱ्या दहशतवादापासून फार मोठा धोका संभवतो आणि कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेता येणार नाही, या मुद्यावर पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांचे एकमत झाले. भारत व इजिप्तमधील धोरणात्मक सहकार्य या संपूर्ण क्षेत्रामध्ये शांती व सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी उपकारक ठरू शकते. म्हणूनच दोन्ही देशांनी आपले सहकार्य धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यानुसार दोन्ही देश राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि विज्ञान क्षेत्रात एकमेकांशी विशेष सहकार्याचा आराखडा तयार करतील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्या दौऱ्यात भारत व इजिप्तमध्ये पाच सहकार्य करार झाले आहेत. या करारांमध्ये सांस्कृतिक क्षेत्र, आयटी, सायबर सुरक्षा, युवावर्ग तसेच दोन्ही देशांच्या सरकारी प्रसारण संस्थांमधल्या ‘कंटेन्ट एक्सचेंज्‌‍’चा समावेश आहे. यानुसार प्रसारभारती व ‘नॅशनल मीडिया अथॉरिटी ऑफ इजिप्त’ संयुक्त प्रकल्प हाती घेणार आहेत. याबरोबरच सध्या सुमारे सात अब्ज डॉलर्सवर असलेला भारत व इजिप्तमधील व्यापार पुढच्या पाच वर्षात 12 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही देशांच्या नेत्यांनी समोर ठेवले आहे. राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्या भेटीदरम्यान, इजिप्त भारताकडून ‘तेजस’ लढाऊ विमाने, रडारयंत्रणा आणि लष्करी हेलिकॉप्टर्स, आकाश क्षेपणास्त्रे आणि स्मार्ट अँटी एअरफिल्ट सिस्टीम्स्‌‍ खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते.

leave a reply