इस्रायलच्या लष्कराचा हिजबुल्लाहला इशारा

Nasrallah-Netanyahuतेल अविव – येत्या काळात इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये युद्ध भडकलेच तर यावेळी इस्रायली लष्कराकडून जोरदार उत्तर मिळेल. इस्रायलच्या तोफा धडाडतील आणि लेबेनॉनवर दर दिवशी हजारो तोफगोळे डागले जातील. इस्रायली लष्कराच्या मारक क्षमतेचे आकलन करणे हिजबुल्लाहसाठी सोपे ठरणार नाही, असा इशारा इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिला. काही दिवसांपूर्वीच इराणने हिजबुल्लाहच्या साथीने इस्रायलवर मोठे हल्ले चढविले जातील, अशी धमकी दिली होती. त्यावर इस्रायलकडून ही प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.

इस्रायलच्या लष्कराचा दहा दिवसांचा सराव सुरू झाला आहे. आर्टिलरी विभागाच्या या सरावात लष्कराच्या तोफा धडाडत आहेत. या आर्टिलरी विभागातील जवानांच्या प्रशिक्षणासाठी तैनात लेफ्टनंट कर्नल एल-शाय कोहेन यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या जवानांच्या तयारीची माहिती दिली. इस्रायलच्या आर्टिलरी विभागाने इतिहासातील घटनांचा अभ्यास करून आपल्या मारक क्षमतेत, अचूक लक्ष्य भेदण्याच्या तंत्रज्ञानात आणि वेगात मोठे बदल केले आहेत, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल कोहेन यांनी दिली.

israel tank shellsयापुढच्या युद्धात आर्टिलरी विभाग महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा कोहेन यांनी केला. इस्रायली आर्टिलरीच्या मारक क्षमतेचे आकलन करणे कुणालाही सोपे ठरणार नाही, असे सांगून कोहेन यांनी हिजबुल्लाहसह हमास तसेच सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. अधिक थेट शब्दात इस्रायली लष्कराच्या तोफा हमाससह कोणत्याही शत्रूविरोधात संघर्षासाठी तयार आहेत. पण येत्या काळातील हिजबुल्लाहबरोबरचे इस्रायलचे युद्ध अतिशय महत्त्वाचे ठरेल, असे कोहेन म्हणाले.

2006 साली इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये भडकलेला संघर्ष 33 दिवस सुरू होता. यामध्ये हिजबुल्लाहने इस्रायलच्या सीमेत जोरदार तोफा व शस्त्रांचे हल्ले चढविले होते. तर वर्षभरापूर्वी हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली होती. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह याने देखील इस्रायलवर याहून अधिक क्षेपणास्त्रे डागण्याची धमकी दिली होती. तर हिजबुल्लाहच्या चुकीचे परिणाम लेबेनॉनला भोगावे लागतील, असे इस्रायलने बजावले होते. त्यामुळे इस्रायली लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या इशाऱ्याचे महत्त्व वाढले आहे.

हिजबुल्लाहने देखील इस्रायलच्या सीमेजवळ किमान 20 नव्या गस्ती टॉवर उभारले आहे. हिजबुल्लाहने हे गस्ती टॉवर स्वतंत्रपणे उभारले असून त्याच्याशी लेबेनॉनच्या लष्कराचा संबंध नाही, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. तर लेबेनॉनमधील सेवाभावी संस्था या हिजबुल्लासाठी काम करीत असल्याचा पर्दाफाश आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने केला. तर हिजबुल्लाहला आर्थिक सल्ले देणाऱ्या लेबेनीज अधिकाऱ्यावर अमेरिकेने निर्बंधांची कारवाई केली आहे.

leave a reply