भारत औषधांची तर पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करीत आहे

- भारताच्या लष्करप्रमुखांचा मर्मभेदी टोला

श्रीनगर – संकटाच्या काळात भारत जगाला औषधांची निर्यात करीत आहे, तर पाकिस्तानची दहशतवादाची निर्यात सुरु आहे, असा मर्मभेदी टोला भारतीय लष्करप्रमुखांनी लगावला. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकंद नरवणे जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. नियंत्रणरेषेवर पाकिस्तानचे लष्कर गोळीबार करुन तिथे दहशतवादी घुसविण्यासाठी जीवाचे रान करीत असताना, भारतीय लष्कराच्या जम्मू आणि काश्मीर भेटीला फार मोठे महत्त्व आले आहे.

जगावर कोरोनाव्हायरसचे संकट कोसळलेले असताना, पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करीत आहे. भारतीय लष्करही त्याला सडेतोड प्रत्त्युत्तर देत आहे. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे जम्मू- काश्मीरच्या भेटीवर आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान पाकिस्तानच्या लष्कराचा नियंत्रणरेषेवर चिथावणीखोर गोळीबार सुरू होता. शुक्रवारी लष्करप्रमुख नरवणे यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला.

‘सारे जग कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करीत आहे. पण शेजारी देश पाकिस्तान मात्र दहशतवादाला खतपाणी घालत आहे’ , असे सांगून लष्करप्रमुखांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा निषेध नोंदविला. ‘आम्ही आमच्या नागरिकांनाच सहाय्य करण्यात व्यस्त नाही. तर जगाच्या मदतीसाठी धावत आहोत. त्यांना वैद्यकीय मदत आणि औषधे पुरवित आहोत. पण पाकिस्तान दहशतवाद निर्यात करतो’, अशा कडक शब्दात लष्करप्रमुखांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. यावर पाकिस्तानमधून प्रतिक्रिया आली असून पाकिस्तानने याचा निषेध केला. भारतीय लष्करप्रमुखांनी केलेला हा आरोप पाकिस्ताने नाकारला आहे.

लष्करप्रमुख नरवणे पाकिस्तानला इशारा देत असतानाच, पाकिस्तानने शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर मॉर्टर्सचा मारा केला. दागले. भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी दहशततवादी घुसखोरीच्या तयारीत होते. यावेळी भारतीय लष्कराने पाच दहशतवाद्यांना ठार केले. तर यात भारताचे पाच जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युतरात पाकिस्तानचे १५ जवान ठार झाले. तसेच ७ दहशतवादी ठार झाले होते.

leave a reply