केनियातून चीनी नागरिकांची हकालपट्टी करा

- केनियन लोकप्रतिनिधींची मागणी

नैरोबी – केनियातील सर्व चिनी नागरिकांची हकालपट्टी करा, अशी जळजळीत मागणी केनियन संसदेचे सदस्य मोसेस कुरी यांनी केली आहे. कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना चीनने आपल्या देशातील आफ्रिकन नागरिकांना तिरस्कारपूर्ण वागणूक दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनमधील केनियन नागरिकांनाही याचा फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर केनियाच्या लोकप्रतिनिधींनी ही मागणी केली असून इतर आफ्रिकन देशांमध्येही असेच सूर लावले जात आहेत.

चीनमध्ये आफ्रिकन नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये चीनच्या काही भागात आफ्रिकी नागरिकांना हॉटेल्स व राहत्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे या आफ्रिकी नागरिकांना उघड्यावर राहण्याची वेळ ओढवली होती.

यामुळे वैतागलेल्या आफ्रिकन्सनी या नरकातून आमची सुटका करा’, असे जाहीर आवाहन या व्हिडिओतून केले होते. आपल्या बांधवांवर होणार्‍या या अत्याचाराचा व्हिडिओ तसेच बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर केनियाचे संसद सदस्य मोसेस कुरी यांनी चिनी नागरिकांनी आमच्या देशातून चालते व्हावे, असे खडसावले आहे.

चीनने आफ्रिकन देशांमध्ये गुंतवणूक केली असून सध्या आफ्रिकन देशांमधील चीनविरोधी वातावरण पाहता ही गुंतवणूक धोक्यात आल्याचे दिसत आहे. पुढच्या काळात याचा फार मोठा फटका चीनला बसू शकतो.

leave a reply