श्रीलंकेच्या बंदरात येत असलेल्या चीनच्या जहाजावर भारताची नजर

नवी दिल्ली – चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे ‘युआन वँग 5′ हे हेरगिरी व अत्यंत संवेदनशील माहिती टिपणारे जहाज श्रीलंकेच्या हंबंटोटा बंदरावर दाखल होणार आहे. या जहाजामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील नौदलाचे तळ आणि इस्रोचा चंदीपूर येथील प्रेक्षेपण तळाला असलेला धोका वाढला आहे. याची गंभीर दखल भारताने घेतली असून श्रीलंकेलाही याची जाणीव करून दिली आहे. तर चीनने मात्र हा आपल्या जहाजाद्वारे केल्या जाणाऱ्या संशोधनाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

Chinese-shipश्रीलंकेत सध्या अराजक माजले असून हा देश भयंकर आर्थिक संकटात सापडला असून अन्नधान्यापासून इंधनाच्या टंचाईच्या समस्येने श्रीलंकन जनतेला ग्रासले आहे. श्रीलंकेत नवे सरकार सत्तेवर आले असून हे सरकार देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी धडपडत आहे. नेमकी ही वेळ साधून चीनने श्रीलंकेच्या हंबंटोटा बंदरात आपले ‘युआन वँग 5′ हे जहाज इंधन भरण्यासाठी येणार असल्याचे सांगून यासाठी श्रीलंकेकडे परवानगी मागितली आहे. हे सर्वसाधारण जहाज नसून चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीद्वारे या जहाजाचा वापर केला जातो. टेहळणी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील माहिती टिपण्याची क्षमता या जहाजामध्ये आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळविण्याचे काम या जहाजामार्फत सहजतेने केले जाऊ शकते. इतकेच नाही तर या जहाजाच्या हिंदी महासागरातील वावरामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील नौदलाचे तळ तसेच चंदीपूर येथील इस्रोच्या उपग्रहांचा प्रक्षेपण तळ, या सर्वांना असलेला धोका प्रचंड प्रमाणात वाढला आहे. चीनने जाणीवपूर्वक ही वेळ निवडून हंबंटोटा बंदरात आपले हे जहाज धाडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

सुमारे 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान हे जहाज हंबंटोटा बंदरात असेल, अशी माहिती दिली जाते. यासाठी श्रीलंकेने इंधन व इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा करावा, अशी विनंती चीनने केली आहे. पण भारत ही बाब अत्यंत गंभीरपणे घेत असून यासंदर्भातील भारताच्या चिंता श्रीलंकेसमोर मांडण्यात आल्याचे दावे केले जातात. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी देशाच्या सुरक्षा व आर्थिक सुविधांना असलेल्या धोक्यांकडे अत्यंत बारकाईने पाहत असल्याचे सांगून त्याविरोधात योग्य ती पावले उचलली जात असल्याचे सूचक विधान केले आहे. यातून सर्वांना योग्य तो संदेश मिळाला असेल, असा दावा बागची यांनी केला आहे.

‘युआन वँग 5′ सारखी क्षमता असलेली जहाजे अमेरिका, रशिया, फ्रान्स व भारतीय नौदलाच्याही ताफ्यात आहेत. त्याचा वापर सुरक्षेसाठी करण्यात येतो. विशेषतः क्षेपणास्त्रे व रॉकेटस्‌‍‍ यांचा वेध घेण्यासाठी अशा स्वरुपाच्या जहाजांचा वापर केला जातो, असे समोर आले आहे. तरीही चीन मात्र आपल्या जहाजाची हिंदी महासागरातील ही भेट म्हणजे सर्वसाधारण बाब असल्याचे भासवित आहे.

दरम्यान, याआधीही हिंदी महासागर क्षेत्रात भारताची सुरक्षा व नैसर्गिक प्रभावाला आव्हान देण्यासाठी चीनने अशा स्वरुपाच्या कारवाया केल्या होत्या. आत्ता देखील चीन श्रीलंकेच्या बिकट अवस्थेचा लाभ घेऊन हंबंटोटा बंदरावर ‘युआन वँग 5′ जहाज पाठवित असल्याचे दिसते. चीनचे कर्ज फेडू न शकल्याने श्रीलंकेला हे हंबंटोटा बंदर 99 वर्षांसाठी चीनच्या हवाली करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र चीनला या बंदराचा लष्करी कारणासाठी वापर करता येणार नाही, अशी अट श्रीलंकेने ठेवली होती. मात्र चीन ही अट गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply