युक्रेनच्या ओडेसा बंदरातून अन्नधान्याचे पहिले जहाज रवाना

युक्रेनच्या ओडेसा बंदरातून अन्नधान्याचे पहिले जहाज रवाना

Port-of-Odessaओडेसा/मॉस्को – संयुक्त राष्ट्रसंघटना व तुर्कीच्या मध्यस्थीने पार पडलेल्या करारानंतर सोमवारी युक्रेनच्या ओडेसा बंदरातून अन्नधान्य घेऊन पहिले जहाज रवाना झाले. पुढील काही दिवसात सदर जहाज तुर्कीच्या इस्तंबूलमार्गे लेबेनॉनच्या त्रिपोली बंदरात दाखल होईल. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेले अन्नधान्याचे संकट दूर होण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. संयुक्त राष्ट्रसंघटनेसह अमेरिका, रशिया, युक्रेन व तुर्कीने याचे स्वागत केले आहे.

दहा दिवसांपूर्वी तुर्कीच्या इस्तंबूल शहरात झालेल्या कार्यक्रमात रशिया व युक्रेनने अन्नधान्याच्या निर्यातीसंदर्भात करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. करारानंतर काही तासातच रशियाने ओडेसा बंदरात क्षेपणास्त्रहल्ला चढविल्याने कराराच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते. युक्रेनसह संयुक्त राष्ट्रसंघटना व अमेरिकेने या हल्ल्यावर टीका केली होती. मात्र रशियाने कराराची अंमलबजावणी व युक्रेनच्या लष्करी ठिकाणांवर होणारे हल्ले या दोन्ही बाबी वेगवेगळ्या असल्याचे सांगून करारासाठी सहकार्य कायम राहिल, असा खुलासा केला होता.

Ukraine-Port-Odessaयुक्रेनमधून अन्नधान्याचे जहाज निघण्यास दोन दिवस राहिले असतानाच रशियाने युक्रेनमधील अन्नधान्याचे आघाडीचे व्यापारी असणाऱ्या ओलेक्सी वॅडाटर्स्कि यांच्या घरावर क्षेपणास्त्रहल्ला चढविला होता. त्यामुळे रशियाच्या इराद्यांवर पुन्हा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र सोमवारी सकाळी ओडेसा बंदरातून जहाज सुरक्षितरित्या बाहेर पडल्याने कराराची अंमलबजावणी सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत. ‘रेझोनी’ असे नाव असलेयल्या या जहाजात 26 हजार टनांहून अधिक मका असून हे जहाज आखातातील लेबेनॉनमध्ये पाठविण्यात येणार आहे.

लेबेनॉनच्या त्रिपोली बंदरात जाण्यापूर्वी जहाजाची तुर्कीच्या इस्तंबूल बंदरात तपासणी करण्यात येईल, असे तुर्कीच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या जहाजापाठोपाठ अन्नधान्याचे साठे असलेली जवळपास 16 जहाजे युक्रेनच्या बंदरात उभी असल्याची माहितीही तुर्कीने दिली. रेझोनी लेबेनॉनमध्ये सुखरुप दाखल झाल्यानंतर पुढील जहाजांच्या प्रवासाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रशिया व युक्रेन हे दोन्ही देश ‘ब्रेडबास्केट’ म्हणून ओळखण्यात येतात. गहू, मका, सूर्यफूलाचे तेल यांच्या निर्यातीत हे देश आघाडीवर आहेत. या देशांकडून प्रामुख्याने आफ्रिकी, आखाती व आशियाई देशांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अन्नधान्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात बाधित झाला होता. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा भडका उडाला असून मोठ्या प्रमाणात अन्नटंचाई निर्माण झाली आहे.

याप्रकरणी रशिया व युक्रेनने परस्परांवर आरोप केले होते. रशियाकडून युक्रेनच्या बंदरांवर सुरू असणाऱ्या हल्ल्यांमुळे अन्नधान्याची निर्यात थांबल्याचा ठपका युक्रेन व पाश्चिमात्य देशांनी ठेवला होता. तर युक्रेनच्या नौदलाने ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रात पेरलेल्या सुरुंगांमुळे जहाजे सुरक्षितरित्या प्रवास करु शकत नाही, असा दावा रशियाने केला होता. या शाब्दिक संघर्षात रशिया व युक्रेनमधील जवळपास दोन कोटी टन अन्नधान्याची निर्यात अडकली होती. यावर तोडगा काढण्यासाठी तुर्की व संयुक्त राष्ट्रसंघटनेने पुढाकार घेतला होता.

leave a reply