एअर इंडिया-एअरबसमधील ऐतिहासिक कराराचे भारत, फ्रान्स व ब्रिटनकडून स्वागत

Air India-Airbus dealनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत एअर इंडिया आणि एअरबस २५० प्रवासी विमानांचा करार झाला आहे. यानुसार एअर इंडिया एअरबसकडून २५० प्रवासी विमाने खरेदी करणार आहे. येत्या काळात हवाई प्रवासाच्या क्षेत्रात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनेल आणि पुढच्या १५ वर्षात भारताला दोन हजार प्र्रवासी विमानांची आवश्यकता भासेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. तर एअर इंडिया व एअरबसमधील हा ऐतिहासिक करार फ्रान्सच्या भारताबरोबरील धोरणात्मक आणि मैत्रिपूर्ण सहकार्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल असल्याचा दावा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

टाटा उद्योगसमुहाचा भाग बनलेल्या एअर इंडियाने गेल्या १७ वर्षात पहिल्यांदाच प्रवासी विमानांच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. यानुसार एअरबसकडून सुमारे २५० प्रवासी विमाने खरेदी एअर इंडियाने केली आहे. यातील ४० विमाने ‘वाईड बॉडी’ अर्थात मोठी, तर २१० ‘नॅरो बॉडी’ विमानांचा यामध्ये समावेश आहे. यासंदर्भातील करार होत असताना पंतप्रधान मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते.

भारताच्या हवाई क्षेत्रात फार मोठी संधी असल्याची जाणीव यावेळी पंतप्रधान मोदी यांनी करून दिली. लवकरच भारत हवाई प्रवासाच्या आघाडीवर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, त्याच तुलनेत भारतातील प्रवासी विमानांची मागणीही वाढेल. पुढच्या १५ वर्षात भारताला सुमारे दोन हजार प्रवासी विमानांची गरज भासणार आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. अशा परिस्थितीत भारतातील या अफाट संधीचा लाभ प्रवासी विमानकंपन्यांची निर्मिती करणाऱ्या देशांना मिळेल, असे सांगून पंतप्रधानांनी एअर इंडिया व एअरबसमधील सदर कराराचे स्वागत केले.

तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी हा ऐतिहासिक करार असल्याचे सांगून फ्रान्स व भारताच्या धोरणात्मक, मैत्रिपूर्ण संबंधांच्या विकासाच्या दिशेने टाकलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचा दावा केला. एअरबसच्या भागीदार कंपन्यांमध्ये फ्रान्सच्या सॅफ्र्रॉन कंपनीचाही समावेश आहे. फ्रान्सची ही कंपनी भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आपले योगदान देण्यास उत्सुक असून उपलब्ध असलेले आधुनिक तंत्रज्ञान फ्रान्स भारताला पुरवित असल्याचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढे म्हणाले. अंतराळापासून ते सायबर क्षेत्रापर्यंत, संरक्षणापासून ते सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत, आरोग्यापासून ऊर्जाविषयक सहकार्यापर्यंत भारत व फ्रान्सचे सहकार्य विकसित होत आहे, असे सांगून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. याबरोबरच भारत व फ्रान्सने मिळून सुरू केलेल्या ‘ग्लोबल सोलर अलायन्स’चा दाखला देखील फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.

दरम्यान, एअर इंडिया व एअरबसमधील या सहकार्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी स्वागत केले आहे. यामुळे रोल्स रॉईस कंपनीसमोर मोठी संधी चालून आली असून यामुळे ब्रिटनच्या वेल्समधील कुशल मनुष्यबळाला रोजगार मिळणार असल्याचा दावा पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी केला.

एअर इंडिया अमेरिकेच्या बोईंगकडून २००हून अधिक विमाने खरेदी करणार
– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा दावा

युरोपातील आघाडीची विमाननिर्मिती कंपनी असलेल्या एअरबसकडून भारताची एअर इंडिया २५० प्रवासी विमाने खरेदी करणार आहे. पंतप्रधान मोदी व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत झालेल्या या करारानंतर, थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून प्रतिक्रिया आली आहे. एअर इंडिया अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून २२० विमाने खरेदी करणार असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उघड केली. हा करार सुमारे ३४ अब्ज डॉलर्सचा असून यात ७० अतिरिक्त विमाने खरेदी करण्याचा प्रस्तावही एअर इंडियाला देण्यात आलेला आहे. यावर सहमती झाल्यास हा एकूण करार ४५.९ अब्ज डॉलर्सवर जाईल, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले.

Air India-Airbusअमेरिकेत तयार झालेली दोनशेहून अधिक विमानांची एअर इंडियाला विक्री करण्यात येत आहे, ही अभिमानाची बाब ठरते व याची घोषणा करताना मला अभिमान वाटत असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्यासह ही भागीदारी विकसित करताना आपल्याला अतिशय समाधान वाटत असल्याचा दावा बायडेन यांनी केला. या करारामुळे अमेरिकेत दहा लाखाहून अधिक जणांना रोजगार मिळे, असा विश्वासही बायडेन यांनी व्यक्त केला आहे. तसेच सदर करार भारत व अमेरिकेतील व्यापारी भागीदारी अधोरेखित करणारा असल्याचा विश्वासही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दावा करीत असलेला हा एअर इंडिया व बोईंगमधील हा व्यवहार रक्कमेचा विचार करता बोईंगने आत्तापर्यंत केलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या करारांपैकी एक ठरतो.

तर विमानांच्या संख्येच्या आघाडीवरील हा बोईंगने केलेला दुसऱ्या क्रमांकाचा व्यवहार ठरेल. मात्र सदर व्यवहाराबाबत भारताने अद्याप कुठल्याही स्वरुपाची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत एअर इंडिया व एअरबसमधील कराराची माहिती उघड झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली ही घोषण लक्ष वेधून घेणारी ठरते. भारताला प्रवासी विमाने पुरविण्याच्या स्पर्धेत अमेरिकन कंपनी देखील मागे नाही, हे या घोषणेद्वारे राष्ट्राध्यक्ष बायडेन जगजाहीर करू पाहत असल्याचे दिसते.

leave a reply