चीनशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली/वॉशिंग्टन – ‘आपल्या सामर्थ्याच्या बळावर भारताच्या क्षेत्रात अधिकार गाजविण्याचा प्रयत्न चीनने केलाच तर भारत चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर देईल. चीनशी टक्कर घेण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे’, अशा परखड शब्दात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला खडसावले आहे. पँगाँग त्सोच्या दक्षिणेकडे असलेल्या टेकड्यांवरुन चिनी जवानांना भारतीय सैनिकांनी हुसकावून लावल्यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनला दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो. भारताच्या लष्करी कारवाईच्या प्रत्युत्तरादाखल चीनने कारवाई केली तर भारत त्याला जबरदस्त प्रत्युत्तर देईल, असा संदेश एस. जयशंकर यांच्या विधानातून दिला जात आहे.

चीनशी टक्कर

‘युएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ या वार्षिक बैठकीत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करुन दिली. ज्याप्रमाणात एखाद्या देशाची प्रगती व विकास होतो, त्याचप्रमाणात त्या देशाचा प्रभाव व वर्चस्व येते, हा सर्वसाधारण व्यवहार आहे. चीनच्या प्रगतीबरोबर या देशाच्या वाढत असलेल्या प्रभावाकडे भारत अतिशय सावधपणे पाहत आहे. पण पुढच्या काळात मात्र चीन भारताची प्रगती व वाढता प्रभाव यांचा अनुभव घेईल’, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. चीनला जशास तसे उत्तर देण्याचे सामर्थ्य भारताकडे आहे आणि त्याचा प्रत्यय सर्वांनाच येईल, अशा नेमक्या शब्दात जयशंकर यांनी भारत चीनबरोबरील संघर्षासाठी तयार असल्याचा इशारा दिला.

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे उद्गार चीनला परिणामांची जाणीव करुन देणारे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एकाच दिवसापूर्वी चीनने अधिकृत पातळीवर भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून आपल्या भूभागात घुसखोरी केल्याचे मान्य केले होते. तसेच भारताने इथून माघार घ्यावी, अशी मागणीही चीनने केली होती. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने चीनचे लष्करी सामर्थ्य भारतापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दावे ठोकून भारताला धमकाविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबत चीनने भ्रमात राहता कामा नये, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला बजावल्याचे दिसत आहे.

दरम्यान, चीनच्या अतिमहत्त्वाकांक्षी कारवायांना वेसण घालण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विकसित होत असलेले लष्करी सहकार्य नाटोच्या धर्तीवर विकसित व्हावे, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. भारताला वगळून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेचे धोरण यशस्वी होऊ शकत नसल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपमंत्री स्टिफन बिगन यांनी म्हटले आहे. भारताच्या या वाढत्या प्रभावाचे फार मोठे दडपण चीनवर येत असल्याचे दिसू लागले असून याचा सामना करणे चीनसाठी अधिकाधिक अवघड बनत चालले आहे. भारतावर लष्करी दडपण वाढविण्यासाठी चीनने केलेले सारे प्रयत्न या देशावर उलटल्याचे दिसत आहे.

leave a reply