श्रीलंकेतील भारताच्या उच्चायुक्तालयाकडून चीनची कानउघडणी

चीनची कानउघडणीकोलंबो – श्रीलंकेला सहाय्याची गरज आहे, आवश्यकता नसलेल्या दबावाची किंवा वाद पेटविण्याची नाही, असे भारताच्या श्रीलंकेतील उच्चायुक्तांनी चीनला खडसावले आहे. भारत श्रीलंकेच्या सार्वभौमत्त्वाची पर्वा न करता या देशात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप चीनच्या राजदूतांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया नोंदविताना भारताच्या उच्चायुक्तालयाने चीनला ही समज दिली. ‘चीनच्या राजदूतांची विधाने त्यांच्या वैयक्तिक विचारांचा भाग असतील, किंवा तो त्यांच्या देशाच्या वर्तनाचाही भाग असू शकेल. पण त्यांच्या या विधानांमुळे राजनैतिक शिष्टाचारांचा भंग होत आहे’, असा टोला भारताच्या उच्चायुक्तालयाने लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी चीनच्या नौदलाचे ‘युआन वँग 5’ नावाचे जहाज श्रीलंकेच्या हंबंटोटा बंदरावर दाखल झाले होते. हे जहाज संशोधनासाठी वापरले जात असल्याचा दावा चीन करीत आहे. पण प्रत्यक्षात हे जहाज हेरगिरी तसेच सुरक्षेच्या संदर्भातील संवेदनशील माहिती टिपण्याची क्षमता बाळगून आहे. म्हणूनच या जहाजाच्या हंबंटोटा बंदरातील वास्तव्यामुळे भारताच्या दक्षिणेकडील संरक्षणदलांचे तळ व इस्रोचे प्रक्षेपण केंद्र धोक्यात येऊ शकते, असे दावे केले जात होते. ही बाब भारताने श्रीलंकेसमोर मांडली व त्यानंतर श्रीलंकेने सदर जहाजाची भेट लांबणीवर टाकली होती.

काही काळाने श्रीलंकेने ‘युआन वँग 5’ला हंबंटोटा बंदरावर येण्याची परवानगी दिली खरी. पण भारताच्या सुरक्षाविषयक चिंता लक्षात घेऊन श्रीलंकेने सदर जहाजावर काही निर्बंध टाकले होते. यामुळे नियमाच्या बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारची आगळीक करणे चीनच्या या जहाजासाठी अवघड बनले होते. यामुळेच चीनकडून भारताच्या विरोधात आगपाखड केली जात आहे. चीनचे श्रीलंकेतील राजदूत क्वी झेंहोन्गॉन यांनी काही देश कुठलाही पुरावा नसताना सुरक्षाविषयक चिंतेचे कारण पुढे करून श्रीलंकेवर दबाव टाकत असल्याचा ठपका ठेवला होता.

तसेच श्रीलंका हा सार्वभौम देश असून या देशाला आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे चीनचे राजदूत पुढे म्हणाले. श्रीलंकेच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. यावर भारताच्या श्रीलंकेतील उच्चायुक्तालयाने प्रतिक्रिया नोंदविली असून कडक शब्दात चीनला समज दिली. चिनी राजदूतांचे उद्गार राजनैतिक शिष्टाचारांचा भंग करणारे असून यातून त्यांची बेपर्वाई किंवा त्यांच्या देशाची वागणूक उघड होत असल्याचे भारताच्या उच्चायुक्तालयाने म्हटले आहे. श्रीलंकेला सहाय्याची गरज आहे, विनाकारण दबाव टाकण्याची किंवा वाद माजविण्याची नाही, अशा थेट शब्दात भारताच्या उच्चायुक्तालयाने चीनला फटकारले.

दरम्यान, श्रीलंकेवर कोसळेल्या आर्थिक संकटाला बऱ्याच प्रमाणात चीनने चढ्या व्याजदराने दिलेले कर्ज जबाबदार आहे. चिनी कर्जाच्या विळख्यात अडकल्यानेच श्रीलंकेची प्रगती खुंटली असून आज या देशात अराजकसदृश्य परिस्थिती आहे. याचा फायदा घेऊन चीन पुन्हा एकदा श्रीलंकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. मात्र श्रीलंकेवरील भारताचा नैसर्गिक प्रभाव असून सध्या या देशात चीनच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. त्याचवेळी भारताने संकटाच्या काळात केलेल्या सहाय्यासाठी श्रीलंकन जनता व सरकार देखील सातत्याने भारताचे आभार मानत आहे. यामुळे अस्वस्थ झालेला चीन भारत श्रीलंकेत हस्तक्षेप करीत असल्याचे आरोप करीत असल्याचे दिसते. चीनला श्रीलंकेचा भारताच्या विरोधात एखाद्या प्याद्यासारखा वापर करायचा आहे, असा ठपका भारताच्या माजी उपराष्ट्र सल्लागारांनी ठेवला आहे.

leave a reply