भारताने रशियन इंधनाची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढविली

नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात भारताने रशियाकडून प्रतिदिनी 16 लाख बॅरल्सपेक्षाही अधिक इंधनतेल खरेदी केले. याआधी भारताला सर्वाधिक प्रमाणात इंधनतेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत सौदी अरेबिया व इराकचा समावेश होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात सौदी व इराककडून आयात केल्या जाणाऱ्या इंधनाच्या बेरजेहून अधिक इंधनतेल भारताने रशियाकडून खरेदी केले आहे. याचा फार मोठा लाभ भारताच्या इंधन कंपन्यांना मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

Russian fuelइंधनव्यवहारांवर नजर ठेवणाऱ्या वोर्टेक्सा कंपनीने भारत व रशियाच्या इंधनव्यवहाराची माहिती दिली. फेब्रुवारी महिन्यात भारताने रशियाकडून प्रतिदिनी सुमारे 16 लाख बॅरल्सहून अधिक प्रमाणात इंधनाची खरेदी केली. युक्रेनच्या युद्धापूर्वी भारत आपल्या मागणीच्या तुलनेत रशियाकडून एक टक्क्याहून कमी प्रमाणात इंधनतेलाची खरेदी करीत होता. पण युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी रशियन इंधनाच्या निर्यातीवर निर्बंध लादले. त्यानंतर रशियाने भारताला सवलतीच्या दरात इंधन पुरविण्याचा प्रस्ताव दिला. याचा पुरेपूर लाभ भारताने घेतला आहे. आजच्या घडीला सौदी अरेबिया, इराक व अमेरिका या देशांना मागे टाकून रशिया भारताला सर्वाधिक प्रमाणात इंधनतेलाचा पुरवठा करणारा देश बनला आहे.

ही माहिती देताना वोर्टेक्साने रशिया सध्या भारताला मागणीच्या 35 टक्के इतक्या प्रमाणात इंधन पुरवित असल्याचे म्हटले आहे. रशियाकडून इंधनतेलाचा पुरवठा वाढत असताना, सौदीकडून भारताला होणारा इंधनाचा पुरवठा 16 टक्क्यांनी, तर अमेरिकेकडून होणारा इंधनाचा पुरवठा 38 टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट केले. गेल्या दशकभराचा विचार केला तर सौदी व इराक हे भारताला इंधनतेलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारे देश होते. पण आता त्यांची जागा रशियाने घेतली आहे, असा दावा वोर्टेक्साने केला.

भारताच्या इंधनकंपन्या रशियाकडून येणाऱ्या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करून मोठ्या प्रमाणात नफा कमावत असल्याची बाबही वोर्टेक्साने लक्षात आणून दिली. भारताबरोबरील हा इंधनव्यवहार रशियन अर्थव्यवस्थेला तारणारा असल्याचे याआधीच उघड झाले होते. म्हणूनच भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करून नये, यासाठी अमेरिका व युरोपिय देशांनी दबाव टाकला होता. अजूनही अमेरिका व युरोपिय देश भारतावर यासाठी दडपण टाकत आहेत. मात्र देशातील ग्राहकांना स्वस्तात इंधन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या भारताच्या राष्ट्रीय कंपन्या इंधनाची खरेदी करताना योग्य पर्याय निवडतात, यात सरकार हस्तक्षेप करीत नाही, असे भारताने स्पष्ट केले होते. तसेच रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणारे इंधन नाकारणे शक्य नाही, याची जाणीव भारताने अमेरिकेसह युरोपिय देशांनाही करून दिली.

भारतावर आपले दबावतंत्र काम करीत नाही, हे लक्षात आल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी वेगळ्या मार्गाने भारत व रशियामधील इंधनव्यवहार रोखण्याचा प्रयत्न केला होता. रशियाकडून कुणीही 60 डॉलर्स प्रतिबॅरल या दरापेक्षा अधिक दराने इंधन खरेदी करू नये, असे निर्बंध अमेरिका व युरोपिय देशांनी लादले होते. या निर्बंधांचा फायदा घेऊन भारताने रशियाकडून अधिक स्वस्तात इंधन खरेदी करावे, असे अमेरिकेने सुचविले होते. पण भारताने याकडे दुर्लक्ष केले आहे.

leave a reply