अमेरिकेसाठी भारत हा महत्त्वाचा भागीदार देश

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

वॉशिंग्टन – भारत हा अमेरिकेसाठी मोठा व अत्यंत महत्त्वाचा भागीदार देश असून भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर आपण सातत्याने संपर्कात आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केले आहे. भारत व चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असून दोन देशांमधील संबंध अधिक भक्कम होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेकडून चीनविरोधातील संघर्षासाठी जागतिक स्तरावर आघाडी उघडण्यात आली आहे. त्यातील भारताची भूमिका व सहभाग महत्त्वाचा असल्याचे संकेत अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांकडून दिले जात आहेत.

America-Indiaभारत हा मोठा भागीदार देश असून अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी माझे अत्यंत चांगले संबंध आहेत. आम्ही सातत्याने संपर्कात असून वेगवेगळ्या मुद्द्यावर आमची चर्चा होते. चीनबरोबरील सीमेवर झालेल्या भारताच्या संघर्षाबाबतही आमच्यात बोलणी झाली. चीनकडून सीमाभागात दूरसंचार व इतर क्षेत्रातील प्रगत सुविधांची उभारणी सुरू आहे. त्यापासून असणाऱ्या धोक्याचा मुद्दाही आमच्या चर्चेचा भाग होता’, अशी माहिती अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी भारत सरकारने ५९ चिनी ॲप्सवर टाकलेल्या बंदीचेही समर्थन केले. ‘भारत सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा होता. संपूर्ण जगाला आता चीनपासून असलेल्या धोक्यांची व आव्हानांची जाणीव होत असून, जगातील लोकशाहीवादी व मुक्त व्यवस्था असणारे देश एकत्र येऊन त्याचा मुकाबला करतील याची मला खात्री आहे’, असेही पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.

America-Indiaगेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने कोरोना साथीसह इतर मुद्द्यांवर चीनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. चीनने भारताविरोधात उकरलेल्या संघर्षामुळे अमेरिकेच्या या चीनविरोधी भूमिकेला अधिकच पाठबळ मिळाले होते. जून महिन्यात भारत-चीन सीमेवरील गलवान व्हॅलीमध्ये चीनने उकरून काढलेल्या संघर्षात भारतीय लष्कराने चीनला चांगलाच दणका दिला होता. भारताने दिलेल्या या धक्क्यामुळे चीनचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच कोंडी झाली आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून अमेरिकेने भारताबरोबरील जवळीक अधिकच वाढवण्यास सुरुवात केली आहे.

गेल्याच आठवड्यात, भारत आणि चीनमधील सीमावादात अमेरिका आपल्या सामर्थ्यानीशी भारताच्या मागे ठामपणे उभी आहे व यापुढेही राहील, असे व्हाईट हाउसचे वरिष्ठ अधिकारी मार्क मिडोज यांनी म्हटले होते. त्यानंतर अमेरिका व भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी, लडाखमधील तणावाचा उल्लेख करत चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर विस्तारवादी धोरणाचा ठपका ठेवला होता. भारत व अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांमध्येही चीन बरोबरील तणावाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत बोलणी झाली होती.

leave a reply