भारत-इस्रायल सायबर सुरक्षा सहकार्य व्यापक करणार

दोन्ही देशांमध्ये करार संपन्न

नवी दिल्ली/जेरुसलेम – भारत आणि इस्रायलमध्ये सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी महत्वाचा करार झाला आहे. जगभरात सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. चीनबरोबरील तणावानंतर भारतात चीन आणि पाकिस्तानातून हजारो सायबर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर भारत आणि इस्रायलमधील सायबर सुरक्षा करार महत्वाचा ठरतो. ”वैश्विक सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताबरोबरील सहकार्य वाढवणे एक महत्वाचे पाऊल आहे.”, असे इस्रायलच्या राष्ट्रीय सायबर महासंचलनालयाचे (आयएनसीडी) महासंचालक यिगल उन्ना यांनी म्हटले आहे. त्यांचे हे विधान या कराराचे महत्व अधोरेखित करते.

India-Israelभारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ आणि इस्रालयलच्या ‘आयएनसीडी’मध्ये हा करार झाला आहे. भारताच्या वतीने या सायबर सुरक्षा करारावर इस्रायलमधील भारताचे राजदूत संजीव सिंगला यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सायबर सुरक्षेसंबंधी माहितीची देवाणघेवाण आणि सायबर सुरक्षेसंबंधित यंत्रणांची उभारणी हा या कराराचा प्रमुख भाग आहेत. इस्रायलच्या सायबर सुरक्षा क्षेत्रातील अनुभवाचा लाभ भारताला होईल, तसेच भारताच्या अशा हल्ल्यांचा मुकाबला करण्याच्या अनुभवाचा इस्रायलला फायदा होईल, असा विश्वास ‘आयएनसीडी’चे महासंचालक उन्ना यांनी यावेळी व्यक्त केला.

सायबर क्षेत्रात मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामध्ये कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे कार्यसंस्कृती वेगाने बदलत असून डिझिटलायझेशनची प्रक्रियेला वेग आला आहे. यातून आणखी नवी आव्हाने खडी ठाकली आहेत, तसेच सायबर हल्ल्यांचा धोकाही वाढला आहे. यामुळे सायबर सुरक्षेशीसंबंधित यंत्रणा आणि सेवा जलदगतीने उभारण्याची आवश्यकता भासत आहे. हे लक्षात घेऊन भारत आणि इस्रायलदरम्यान हा सायबर सुरक्षा सहकार्य करार पार पडल्याचे उन्ना म्हणाले.

दरम्यान, २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यात भारत-इस्रायलमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी ज्या क्षेत्रांना प्राथमिकता देण्याचे निश्चित झाले होते, त्यामध्ये सायबर सुरक्षा हे प्रमख क्षेत्र होते. या दौऱ्यात सायबर सुरक्षेसंबधी एक प्राथमिक करार झाला होता व या करारावर २०१८ पासून अंमलबजावणी सुरु झाली होती. २०१८ सालापासून दोन्ही देशांच्या अधिकऱ्यांमध्ये सतत बैठका सुरु आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी इस्रायलला गेल्यावर्षी भेट दिली होती. सायबर सुरक्षेसंबंधी चर्चासत्रांचे दोन्ही देशांनी आयोजन केले होते. नवा करार याच प्राथमिक कराराला व्यापक सायबर सहकार्याचे स्वरूप देणारा असल्याचे सांगितले जाते.

leave a reply