भारत हा ब्रिटनचा ‘नैसर्गिक भागीदार’ देश

भारतभेटीवर आलेल्या ब्रिटनच्या संरक्षणदलप्रमुखांचा दावा

नवी दिल्ली/लंडन – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी भारताशी सहकार्य वाढविल्याखेरीज पर्याय नाही, याची जाणीव जगभरातील प्रमुख देशांना झालेली आहे. म्हणूनच इंडो-पॅसिफिकसाठी भारताशी सहकार्य करण्याकरीता जगभरातील प्रमुख देश पुढाकार घेत आहेत. या स्पर्धेत आपण मागे राहणार नाही, यासाठी ब्रिटनने देखील पावले उचलली आहेत. ब्रिटनचे संरक्षणदलप्रमुख ॲडमिरल सर टोनी रॅडकिन भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारत हा ब्रिटनचा ‘नैसर्गिक भागीदार’ देश ठरतो, असा दावा यावेळी ब्रिटनच्या संरक्षणदलप्रमुखांनी केला. तर ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी भारत हा आपल्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा संरक्षणविषयक भागीदार देश असल्याचे म्हटले आहे.

natural partnerतीव्र स्पर्धेच्या आणि अनिश्चितेच्या काळात भारत व ब्रिटन एकमेकांचे नैसर्गिक भागीदार देश ठरतात, असा दावा ॲडमिरल रॅडकिन यांनी केला. नवी दिल्लीत ॲडमिरल रॅडकिन यांनी भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांची भेट घेतल्यानंतर हे विधान केले. भारत व ब्रिटनच्या संरक्षणदलांमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी दोन्ही देशांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे, असे सांगून दोन्ही देश एकमेकांना फार मोठे सहाय्य करू शकतात, असा दावा ॲडमिरल रॅडकिन यांनी केला. हे संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्यासाठी भारत व ब्रिटनमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बैठका पार पडणार असल्याची माहिती यावेळी ब्रिटनच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिली.

ब्रिटनचे संरक्षणदलप्रमुख भारतात असतानाच, ब्रिटनच्या वायुसेनाप्रमुखांच्या भारतभेटीची बातम्या येत आहेत. ब्रिटनचे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल सर माईक विग्स्टन यांनी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची भेट घेतली. यामुळे ब्रिटन भारताबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य व्यापक करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी ब्रिटनला भारताबरोबर सहकार्य व्यापक करण्याची आवश्यकता वाटत असल्याचे दिसते. ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीरपणे ही बाब मांडली होती.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पुरस्कार करणारा देश म्हणून ब्रिटनला इंडो-पॅसिफिक क्षेत्र खुले, मुक्त व स्वतंत्र असणे अपेक्षित आहे. यासाठी ब्रिटन या क्षेत्रासाठी अधिक पुढाकार घेत असल्याचा दावा संरक्षणमंत्री वॉलेस यांनी केला. संरक्षणदलप्रमुख ॲडमिरल सर टोनी रॅडकिन यांच्या भारतीय संरक्षणदलप्रमुखांबरोबरील चर्चेच्या निमित्ताने ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांची ही विधाने अधिक ठळकपणे माध्यमांसमोर मांडली जात आहेत.

दरम्यान, फ्रान्स व जर्मनी या देशांनी देखील इंडो-पॅसिफिकसाठी आपण भारताशी सहकार्य वाढविणार असल्याची घोषणा याआधीच केली आहे. अमेरिका तर सातत्याने खुल्या, मुक्त व स्वतंत्र इंडो-पॅसिफिकसाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगून यासाठी भारताबरोबर सहकार्य वाढविणार असल्याचे सांगत आहे. इतकेच काय पण कॅनडासारख्या देशाने देखील आपल्या धोरणात इंडो-पॅसिफिकचा विशेष उल्लेख करून भारताबरोबरील सहकार्य वाढविण्याची घोषणा केली आहे. तर जपान व या क्षेत्रातील इतर देश भारताबरोबरील आपली मैत्री अधिक घट्ट करून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी करीत आहे.

अशा परिस्थित ब्रिटनने भारताबरोबर सहकार्य वाढविण्यासाठीचे आपले प्रयत्न अधिकच वाढविल्याचे ॲडमिरल सर टोनी रॅडकिन यांच्या या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे.

leave a reply