पॅलेस्टाईनच्या फताह-हमासचे नेते सौदीच्या दौऱ्यावर

राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास व क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट

abbas princeरियाध – पॅलेस्टाईनमधील दोन प्रभावी राजकीय पक्ष फताह आणि हमासचे नेते सौदी अरेबियाच्या भेटीवर आहेत. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष आणि फताहचे पक्षप्रमुख महमूद अब्बास यांनी मंगळवारी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. यावेळी इस्रायलबरोबर रखडलेली शांतीचर्चा आणि पॅलेस्टाईनची निर्मिती या मुद्यावर चर्चा पार पडल्याचा दावा केला जातो. मात्र इराण-कतार संलग्न हमास या संघटनेच्या प्रमुखांच्या सौदी भेटीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या वेस्ट बँकमधील प्रशासनाला अमेरिकेसह युरोपिय तसेच अरब मित्रदेशांचीही मान्यता आहे. पण गाझापट्टीतील हमास ही दहशतवादी संघटना असल्याचे अमेरिका व इस्रायलने घोषित केले आहे. अरब देशांनी हमासला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकले नसले तरी इराण व कतारशी संलग्न असलेल्या या संघटनेशी जवळीक ठेवलेली नाही. सौदीचे याआधीचे राजे अब्दुल्लाह यांनी हमासचा नेता इस्माईल हनिया याची भेट घेतली होती. पण हमास ही संघटना पॅलेस्टिनींच्या हिताची नसल्याची टीका सौदीच्या नेत्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केली होती.

saudi hamasअशा परिस्थितीत, हमासचे नेते इस्माईल हनिया, खालेद मेशाल, मुसा अबू मुरझाक यांनी सौदीला दिलेली भेट लक्षवेधी ठरते. त्यातच हमासचे नेते रविवारीच सौदीमध्ये दाखल झाले होते. तर पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास हे सोमवारी सौदीच्या जेद्दामध्ये उतरले. यानंतर मंगळवारी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. हमासचे नेते क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांची भेट घेणार आहेत का? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण फताह-हमासमध्ये सलोखा प्रस्थापित करण्यासाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स प्रयत्न करतील, असा दावा आखातातील काही माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इतर अरब देशांप्रमाणे सौदीबरोबरही अब्राहम करार करणार असल्याची घोषणा केली होती. पण पॅलेस्टाईनचा मुद्दा सुटल्याशिवाय इस्रायलशी सहकार्य शक्य नसल्याचे सौदीने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर फताह-हमासच्या नेत्यांची सौदीतील उपस्थिती अत्यंत महत्त्वाची घटना ठरते.

leave a reply