भारत व जपानची ‘टू प्लस टू’ चर्चा

‘टू प्लस टू’ चर्चाटोकिओ – आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झालेली असताना, भारत आणि जपानमध्ये दुसरी ‘टू प्लस टू’ चर्चा पार पडत आहे, असे सांगून भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दोन्ही देशांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारत व जपानमधील संरक्षणविषयक सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. चीनच्या वर्चस्वावादी कारवायांमुळे निर्माण झालेल्या असमतोलाच्या पार्श्वभूमीवर, भारत व जपान आपले सर्वच आघाड्यांवरील सहकार्य भक्कम करीत असल्याचा संदेश ‘टू प्लस टू’ चर्चेद्वारे देण्यात आला.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, जपानचे संरक्षणमंत्री यासुकाझु हमादा आणि परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी यांच्यात गुरुवारी ही टू प्लस टू चर्चा सुरू झाली. दोन्ही देशांमधली ही दुसरी टू प्लस टू चर्चा ठरते. या चर्चेमुळे भारताचे जपानबरोबरील धोरणात्मक सहकार्य नवी उंची गाठत असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची बनलेली असताना, भारत व जपानमध्ये ही चर्चा सुरू होत आहे, याचा दाखला देऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दोन्ही लोकशाहीवादी देशांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारत व जपान आंतराष्ट्रीय नियमांचा आदर करणारे व नियमांवर आधारलेल्या जागतिक व्यवस्थेचा पुरस्कार करणारे आहेत. तसेच दोन्ही देशजागतिक अर्थव्यवस्थेचा विकास सुनिश्चित करणारे आहेत . मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राबाबतची दोन्ही देशांची भूमिका एकसमान आहे, असे जयशंकर पुढे म्हणाले.

तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारत व जपानच्या राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असल्याची आठवण यावेळी करून दिली. आशिया खंडातील लोकशाहीवादी देश असलेल्या भारत व जपानमधील सहकार्य पॅसिफिक महासागरातील शांती व समृद्धीसाठी अत्यावश्यक ठरते, अशा सूचक शब्दात संरक्षणमंत्र्यांनी भारताची भूमिका मांडली. दोन्ही देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य अधिकच भक्कम करण्याची आवश्यकता असल्याचे राजनाथ सिंग यांनी ठासून सांगितले. सदर चर्चेच्या आधी जपानचे संरक्षणमंत्री यासुकाझु हमादा यांच्याबरोबरील चर्चेतही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारत व जपानमधील युद्धसरावांचे अधिक प्रमाणात आयोजन करण्याची आवश्यका असल्याचे म्हटले होते. यानुसार भारत व जपानच्या युद्धसरावांची व्याप्ती अधिकच वाढविली जाणार असून यामध्ये दोन्ही देशांच्या हवाई दलांच्या सरावांचाही समावेश केला जाणार आहे.

भारत व जपानने संरक्षणसाहित्याच्या निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवावे, अशी अपेक्षाही यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. उभय देशांची धोरणात्मक भागीदारी अधिकच भक्कम करण्याचा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व जपानचे संरक्षणमंत्री यासुकाझु हमादा यांनी व्यक्त केला. दरम्यान, तैवानच्या आखातातील चीनच्या आक्रमक कारवाया वाढत चालल्या असून याचा फार मोठा परिणाम जपानच्या सुरक्षेवर होत आहे. यामुळे जपानने तैवानला सहाय्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तैवानवरील चीनचा हल्ला म्हणजे जपानवरील हल्लाच मानला जाईल, असे जापानने बजावले आहे. अशा परिस्थितीत भारताचे जपानबरोबरील धोरणात्मक सहकार्य दृढ करण्याची घोषणा म्हणजे दोन्ही देशांनी चीनला दिलेला इशाराच ठरतो.

कोरोनाच्या साथीनंतर जागतिक उत्पादनाचे केंद्र बनलेल्या चीनमधील उत्पादनाच्या साखळीवर विपरित परिणाम झाला होता. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने जगासमोर फार मोठे संकट खडे ठाकले होते. त्याची गंभीर दखल घेऊन भारत व जपानने अधिक भक्कम जागतिक पुरवठा साखळी उभी करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्याचे प्रतिबिंब जपानची राजधानी टोकिओमध्ये पार पडलेल्या या टू प्लस टू चर्चेत पडल्याचे दिसत आहे.

leave a reply