भारत धोरणात्मक संयम राखून ‘एलएसी’वर वाटाघाटी करीत आहे

- लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

उधमपूर – चीनबरोबरील एलएसीवर परिस्थिती स्थिर आहे. मात्र हाय ॲलर्ट कायम असून कोणतीही हिंसक संघर्षाची परिस्थिती उद्भविणार नाही, यासाठी दोन्ही बाजूने विविध माध्यमातून संवाद सुरू आहे, असे लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले. तसेच भारताकडे आता धोरणात्मक संयम आहे आणि मजबूत स्थितीत भारताच्या वाटाघाटी सुरू आहेत, असे लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

वाटाघाटीजम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये लष्कराच्या नॉर्दर्न कमांडच्या मुख्यालयात ‘नॉर्थ टेक सिम्पोसिअम’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लेफ्टनंट जनरल द्विवेदी बोलत होते. लष्कराचे नॉर्दर्न कमांड कारवाईच्यादृष्टीने अतिशय संवेदनशील असल्याने येथे नेहमी युद्धासाठी सज्ज रहावे लागते. त्यामुळे येथे लष्कराला आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीनंतर व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिउंचीवरील भागात भारतीय लष्कराने तैनाती वाढविण्यास सुरुवात केली. याला ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ असे नाव देण्यात आले. या ऑपरेशनमधून संरक्षणदलांनी महत्त्वाचे धडे गिरविल्याचे लेफ्टनंट जनरल द्विवेदी म्हणाले.

जवानांची जलदगतीने सीमेवर तैनाती करण्यावर व पायाभूत सुविधांच्या विकासावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत आहे. तसेच लष्कर सीमेची सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा या दोन्ही आव्हानांसाठी उत्तर शोधत आहे. यामुळे या भागात लष्करी सज्जता ठेवणे सोपे होईल, ही बाब लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी अधोरेखित केली. भारताची सध्याची सीमेवरील स्थिती मजबूत आहे. भारताचे शत्रू पुन्हा धाडस करणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच एलएसीबाबत विचार करायचा झाला, तर वाटाघाटी लांबू शकतात, असे संकेत लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी दिले आहेत. ‘चीनकडे धोरणात्मक संयम आहे आणि त्यांना अपेक्षित निकाल मिळत नाहीत, तोपर्यंत ते प्रतीक्षा करायला तयार असतात, असे याआधी बोलले जायचे. आता भारताकडेही धोरणात्मक संयम आहे आणि आम्हीही प्रतीक्षा करायला तयार आहोत. याचा अर्थ भारताची स्थिती मजबूत आहे’, असे लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी अधोरेखित केले. तसेच भारताच्या सज्जतेमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची खात्री देतो, अशी ग्वाही लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी दिली.

शुक्रवारी एलएसीवर लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीला दोन वर्ष पूर्ण झाली. 2020 साली 5 मे रोजी लडाखमध्ये पँगॉंग-त्सो जवळ चीनच्या घुसखोरीनंतर भारतीय सैनिक व चीनचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकले होते. प्रत्यक्षात घुसखोरीला एप्रिल महिन्यात सुरुवात झाली होती. त्यानंतर एलएसीवर आणखी काही भागातून चिनी सैनिकांच्या घुसखोरीच्या बातम्या आल्या. यामुळे भारत आणि चीनचा तणाव वाढला. तर 16 जून रोजी गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील हा तणाव शिगेला पोहोचला व युद्धाची स्थिती तयार झाली होती. दोन्ही देशांमध्ये गेल्या दीड वर्षात तणाव कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा झाली आहे. तसेच कमांड स्तरावर चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत. गलवान, पँगॉंग-त्सोसह काही भागातून चीनने सैन्य माघारीही घेतले आहे. पण काही भागात चीनचे सैनिक मागे गेलेले नाही. तसेच एलएसीवर चीनमध्ये आपल्या जवानांची मोठ्या प्रमाणावर तैनाती केलेली आहे. या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी दिलेली ग्वाही व भारताच्या स्थितीबद्दलची माहिती महत्त्वाची ठरते.

leave a reply