कतारच्या भारतातील गुंतवणुकीसाठी भारत-कतार स्पेशल टास्क फोर्स स्थापन करणार

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कतारचे अमीर ‘शेख तमीम बिन हमाद अल-थानी’ यांच्यात फोनवरून चर्चा पार पडली. कतारची भारतातील गुंतवणूक अधिक सुलभतेने व्हावी, यासाठी दोन्ही नेत्यांनी ‘स्पेशल टास्क फोर्स’ची स्थापना करण्याचा निर्णय या चर्चेत घेतला. ऊर्जासुरक्षा व गुंतवणूक या दोन्ही आघाड्यांवर कतार हा भारताचा महत्त्वाचा भागीदार देश ठरतो. त्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर अल-थानी यांच्यात पार पडलेली ही चर्चा महत्त्वाची ठरत आहे.

स्पेशल टास्क फोर्स

लवकरच कतारचा राष्ट्रीय दिन साजरा केला जाईल. त्याचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर अल-थानी यांना शुभेच्छा दिल्या. तर आपल्या या राष्ट्रीय दिनासाठी कतारमधील भारतीय दाखवित असलेल्या उत्साहाचे अल-थानी यांनी कौतुक केले आहे. भारतीय पंतप्रधानांबरोबरील आपली सकारात्मक चर्चा पार पडल्याची माहिती अल-थानी यांनी दिली आहे.

इंधनसंपन्न असलेला कतार भारताच्या ऊर्जासुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा देश ठरतो. त्याचवेळी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या आखाती देशांमध्ये कतारचाही समावेश आहे. म्हणूनच पुढच्या काळात कतारमधून भारतात होणारी गुंतवणूक अधिक सुलभतेने व्हावी, यासाठी उभय देशाच्या नेत्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच उभय देश यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करतील. यामुळे भारतातील कतारची गुंतवणूक अधिक प्रमाणात वाढणार आहे.

या महिन्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर कतारला भेट देणार आहेत. या भेटीतही दोन्ही देशांकडून महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. इतर आखाती देशांबरोबरच कतारबरोबरील भारताचे वाढते सहकार्य वाढत असताना, पाकिस्तानचे या देशांबरोबरील संबंध ताणले जात असल्याचा ओरडा पाकिस्तानी माध्यमांमधून केला जातो. नोव्हेंबर महिन्यात कतारने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाच्या परतफेडीची मागणी केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

भारत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात व कतारसारख्या इंधनसंपन्न आखाती देशांबरोबरील संबंध दृढ करीत असताना, या देशांबरोबरील पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले आहेत, हा योगायोग नाही. तर ते भारताच्या परराष्ट्र धोरणाला मिळालेले फार मोठे यश ठरते आणि त्याचवेळी हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याची टीका पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी करीत आहेत. पुढच्या काळात आपल्या देशात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी कामगार व कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून तिथे भारतीयांची नियुक्ती करतील, अशी चिंता पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी करीत आहे. असे असूनही पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय या समस्येकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देत नाही, अशी टीका भारतातील पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बसित यांनी केली आहे.

leave a reply