अर्जुन रणगाड्याची अद्ययावत आवृत्ती लष्करात दाखल होणार

‘अर्जुन मार्क-1ए’च्या अंतिम चाचण्या पूर्ण

जैसलमेर – भारतीय बनावटीच्या अर्जुन रणगाड्याची अद्ययावत आवृत्ती असलेल्या ‘अर्जुन मार्क-1ए’च्या लष्करात समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या पोखरणमध्ये अर्जुनच्या या अद्ययावत आवृत्तीच्या अंतिम चाचण्या सुरू होत्या. या चाचण्या यशस्वी ठरल्याचे वृत्त आहे. ‘हंटर किलर’ नावानेही प्रसिद्ध असलेल्या या रडगाड्याच्या खरेदीसाठी भारतीय लष्कराने मार्च महिन्यात मागणी नोंदविली होती. लष्कराकडून 118 ‘अर्जुन मार्क-1ए’ रडगाडे खरेदी केले जाणार आहेत. मात्र लष्कराने डीआरडीओला यामध्ये काही बदल सुचविले होते. हे बदल केल्यानंतर या चाचण्या पार पडल्या आहेत. त्यामुळे आता लष्करात ‘अर्जुन’च्या या अद्ययावत आवृत्तीच्या लवकरच समावेशाची शक्यता आहे.

अर्जुन

हलत्या लक्ष्याचाही अचूक वेध घेणाऱ्या, तसेच युद्धभूमीवर पेरण्यात आलेल्या सुरुंगांना बरोबर हेरून ते निकामी करून पुढे जाण्याची क्षमता असलेल्या ‘अर्जुन मार्क-1ए’च्या सर्व चाचण्या पुर्ण झाल्या आहेत. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ने (डीआडीओ) विकसीत केलेल्या ‘अर्जुन’ रणगाड्यांचा समावेश 2004 साली भारतीय लष्करात झाला होता. या ‘अर्जुन’ रणगाड्याची अद्ययावत आवृत्ती ‘अर्जुन मार्क-1ए’च्या रुपात डीआरडीओने तयार केली आहे.

जुन्या ‘अर्जुन’ रणगाड्यांमध्ये यासाठी सुमारे 72 बदल करण्यात आले. सेंसर यंत्रणा व इतर आधुनिक यंत्रणांनी हा रणगाडा सज्ज करण्यात आला. या अद्ययावत आवृत्तीच्या चाचण्या पार पडल्यानंतर मार्च महिन्यात लष्कराने 118 रणगाड्यांची मागणीही नोंदविली होती. मात्र लष्कराने या रणगाड्यांमध्ये आणखी बदल सुचविले होते. यानंतर सुरक्षादलाच्या मागणीनुसार आणखी 14 बदल करून ‘अर्जुन मार्क-1ए’च्या चाचण्या पोखरणमध्ये पार पडल्या.

या चाचण्या सुरू असताना डीआरडीओचे अधिकारी, या रडगाड्यांच्या अद्ययावतीकरणात व यासाठीच्या संशोधनात सहभागी असलेले तज्ज्ञ, तसेच लष्कराचे अधिकारीही उपस्थित होते. इतक्या बदलानंतर ‘अर्जुन मार्क-1ए’ जगातील सर्वात घातक रणगाड्यांपैकी एक बनला आहे. या रणगाड्यांमध्ये स्वयंचलित टार्गेट ट्रॅकिंग सिस्टिम आहे. यामुळे आपले लक्ष ओळखून हलत्या लक्ष्याचाही अचूक भेद घेतला जाऊ शकतो. तसेच या रणभूमीवर शत्रूने पेरलेले सुरुंग बाजूला सारून पुढे जाण्याची क्षमता यामध्ये आहेच. तसेच खांद्यावरून सोडल्या जाणाऱ्या छोट्या क्षेपणास्त्रांचा प्रभाव या रणगाड्यावर होणार नाही, असेही दावे केले जात आहेत.

दिवसा व रात्री दोन्ही वेळी युद्धात या रणगाड्यांचा प्रभावी वापर होऊ शकतो. या रणगाड्यांमध्ये विशेष पद्धतीचे सेंसर्स बसविलेले असून रासायनिक आणि अणुहल्ला झाल्यास अलार्म वाजेल व या रणगाड्यांच्या आतमध्ये हवेचा दाब वाढेल. त्यामुळे बाहेरील हवा आत येणार नाही व आतमध्ये असलेल्या अधिकारी व जवानांचे संरक्षण होईल, अशीही माहिती समोर येत आहे.

leave a reply