चीनच्या दुटप्पी धोरणाला उत्तर देण्याची भारताची तयारी

नवी दिल्ली – लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, राजधानी नवी दिल्ली येथे अत्यंत महत्त्वाची सुरक्षा विषयक बैठक पार पडली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मुकूंद मनोज नरवणे या बैठकीला उपस्थित होते. लवकरच भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची चर्चा अपेक्षित आहे. त्याआधी राजधानी दिल्लीत झालेली ही सुरक्षाविषयक बैठक महत्त्वाची ठरते. त्याचवेळी लडाखच्या सीमाभागातील चिनी सैनिकांवर इथल्या हिवाळ्याचा परिणाम दिसू लागला असून चीनचे जवान आजारी पडू लागल्याच्या बातम्या येत आहेत.

भारताची तयारी

पुढच्या दोन ते तीन दिवसात भारत आणि चीनच्या लष्कराचे ब्रिगेडिअर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये आधी झालेल्या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नव्हते. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याबरोबरील चर्चेत सीमावाद सोडविण्याची सौम्य भूमिका घेणारा चीन लष्करी चर्चेत मात्र आक्रमक भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी लष्करी चर्चेदरम्यान, चिनी जवानांकडून घुसखोरीचे प्रयत्न झाल्याच्या घटनाही उघड झाल्या होत्या. त्यामुळे पुढच्या काळात चीनबरोबर सर्वच पातळ्यांवर चर्चा करीत असताना, भारताला अतिशय कणखरपणे आपली भूमिका मांडावी लागेल, असे दिसत आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या सुरक्षा विषयक बैठकीत चीनच्या दुटप्पीपणाचा मुद्दा अग्रस्थानी होता, असे माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, लडाखमध्ये अजूनही भारतावर लष्करी दडपण वाढविण्याच्या हालचाली चीनने थांबविलेल्या नाहीत. पण या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात सैन्य तैनाती करणार्‍या चिनी लष्करासमोर आता कडक हिवाळ्याचे आव्हान खडे ठाकले आहे. लडाखच्या पहाडी वातावरणाशी सवय नसलेल्या चिनी जवानांना इथे श्वास घेताना त्रास होत आहे. त्यामुळे येथील काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच अशारितीने श्वसनाचा त्रास होणार्‍या जवानांची संख्या वाढू लागल्याने चिनी लष्कराच्या चिंतेत नवी भर पडली आहे. पुढच्या काळात जसाजसा गारठा वाढत जाईल, त्याचप्रमाणात चिनी लष्कराची अवस्था अधिकाधिक बिकट बनेल, असे भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर, चीनने घुसखोरी केलेल्या क्षेत्रात ५० जवान कायम तैनात ठेवून बाकीच्या जवान मागे घेण्याचा प्रस्ताव भारताला दिल्याची चर्चा आहे. याच्या मोबदल्यात चीन भारताकडून पूर्ण सैन्य माघारीची मागणी करीत आहे. भारताने ही मागणी धुडकावल्याचेही बोलले जाते. मात्र हिवाळ्यामुळे चीनला आपले जवान या क्षेत्रातून मागे घ्यावे लागले तरी, आपली प्रतिष्ठा वाचविण्यासाठी चीन अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर घुसखोरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी भारतीय लष्कराने अरुणाचलच्या सीमेवर पूर्ण तयारी केली आहे. या सीमाभागातही लष्कराची तैनाती वाढविण्यात आली असून इथल्या चिनी लष्कराच्या कारवायांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच भारतीय वायुसेनेची चीन लगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सज्जता वाढविण्यात आली असून लडाखच्या क्षेत्रात देशाच्या हवाई सीमेचे रक्षण करण्यासाठी वायुसेनेची लढाऊ विमाने गस्त घालत आहेत.

leave a reply