रशिया अतिपूर्वेकडील भागांमध्ये लष्करी तैनाती वाढविणार

- संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु

मॉस्को – चीन सीमेसह आशिया पॅसिफिक क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपल्या अतिपूर्वेकडील भागांमध्ये (फार ईस्ट) लष्करी तैनाती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी ही घोषणा केली आहे. अतिरिक्त लष्करी तुकड्यांसह नव्या व प्रगत संरक्षणयंत्रणांचा समावेश असलेली ५०० युनिट्स तैनात करण्यात येतील, असे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी सांगितले.

लष्करी तैनाती

चीनकडून साऊथ व ईस्ट चायना सीमध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्ववादी कारवाया सुरू आहेत. चीनच्या या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने आपली या क्षेत्रातील संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्याचवेळी जपान, दक्षिण कोरिया, तैवान या देशांकडूनही लष्करी सज्जतेसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात अमेरिका व चीनदरम्यान युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, रशियानेही तयारी सुरु केल्याचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांच्या घोषणेवरून दिसून येत आहे. शोईगु यांनी ‘फार ईस्ट’मध्ये अतिरिक्त लष्करी तैनातीची माहिती देतानाच आर्क्टिक क्षेत्राची जबाबदारी असणाऱ्या रशियन नौदलाच्या नॉर्दर्न फ्लीटसाठीही वाढीव तैनातीचे संकेत दिले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमीत्रि पेस्कोव्ह यांनीही फार ईस्ट रिजनमधील संरक्षण तैनातीच्या वृत्ताला दुजोरा दिला. यावेळी त्यांनी, अमेरिकेचे नाव न घेता या क्षेत्राबाहेरील देशांच्या कारवायांमुळे तणाव निर्माण झाल्याचा आरोपही केला.

दरम्यान, रशियाकडून करण्यात येणाऱ्या अतिरिक्त तैनातीचा संबंध या भागात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाशी असू शकतो, असा दावा काही विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. चीन सीमेला जोडून असलेल्या ‘खाबरव्होस्क’ शहरात एक महिन्याहून अधिक काळ पुतीन यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत.

leave a reply