सशस्त्र ड्रोनद्वारे भारताची चीनवर मात करण्याची तयारी

- अमेरिकी नियतकालिकाचा दावा

वॉशिंग्टन – भारतीय संरक्षणदल इस्त्रायल निर्मित ‘हेरॉन’ ड्रोन्स स्मार्ट बॉम्बने सुसज्ज करण्याच्या प्रयत्‍नात आहे. त्याचबरोबर भारतीय संरक्षणदलाने अमेरिकेकडून ‘एमक्यू-९बी सीगार्डियन’च्या सशस्त्र आवृत्तीच्या खरेदीसाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सशस्त्र ड्रोन्सची सज्जता वाढविण्यासाठी सदर पावले टाकल्याचा दावा अमेरिकी नियतकालिकाने केला. तर चीनने देखील तिबेटच्या पठारावर ‘एआर-५००सी’ या सशस्त्र हेलिकॉप्टर ड्रोनची यशस्वी चाचणी घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

सशस्त्र ड्रोन

भारत आणि चीन लडाखच्या नियंत्रण रेषेजवळील आपल्या सैन्य तैनातीवर ठाम असून हळुहळू या भागातील हिवाळा वाढत चालला आहे. विरळ हवामान आणि अत्यंत कडक हिवाळ्यात या भागात हवाई आणि लष्करी मोहिमा राबविणे आव्हानात्मक ठरू शकते. अशा परिस्थितीत, लडाखमध्ये मानवरहित हल्लेखोर ड्रोन्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावा अमेरिकेतील प्रसिद्ध नियतकालिकाने केला आहे. चीनने या क्षेत्रातील हल्लेखोर ड्रोन्सची चाचणी व तैनाती वाढवून याचे संकेत दिले आहेत. तर भारताने देखील आपल्या ड्रोन्सना सशस्त्र करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलली आहेत, याकडे सदर मासिकाने लक्ष वेधले.

सशस्त्र ड्रोनलडाखमधील भारतीय सैन्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी चीनने दक्षिण तिबेटच्या भागात ड्रोन्स तैनात केल्याच्या बातम्या जून महिन्यातच प्रसिद्ध झाल्या होत्या. यामध्ये ‘विंग लूंग’ या सशस्त्र ड्रोन्सचा समावेश होता का, याची माहिती उघड होऊ शकलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून चीनने तिबेटच्या पठारावर ‘एआर-५००सी’ या सशस्त्र हेलिकॉप्टर ड्रोन्सची चाचणी सुरू असून लवकरच चीन सदर ड्रोन्स या भागात तैनात करील, असा दावा केला जातो. ८० किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले हे हेलिकॉप्टर ड्रोन पाच तास भरारी घेऊ शकते, असे चीनच्या मुखपत्राने नुकतेच प्रसिद्ध केले होते. लडाखच्या सीमेवरील चीनच्या या ड्रोन तैनातीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही हालचाली वाढविल्याचे अमेरिकी नियतकालिकाने लक्षात आणून दिले.

सशस्त्र ड्रोन

गेल्या महिन्याभरात भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा हवाला या नियतकालिकाने दिला आहे. यात भारताने आपल्या ताफ्यातील इस्रायल निर्मित ‘हेरॉन’ ड्रोन्सना स्मार्ट बॉम्ब अर्थात लेझर गायडेड क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. भारतीय संरक्षणदलांच्या ताफ्यात ९० ‘हेरॉन’ ड्रोन्स आहेत. भारतीय लष्कर, वायुसेना तसेच नौदलाकडून या ड्रोन्सचा टेहळणीसाठी वापर केला जातो. पण याच ड्रोन्सना अद्ययावत तंत्रज्ञानासह स्मार्ट बॉम्बने सज्ज करीत असल्याचे वृत्त समोर आले होते. शत्रूची ठिकाणे तसेच रणगाडा रेजिमेंटला लक्ष्य करण्यासाठी या ड्रोन्सना लेझर गायडेड बॉम्ब तसेच रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज केले जात असल्याचा दावा केला जातो. या व्यतिरिक्त, अमेरिकेकडून ३० ‘एमक्यू-९बी सीगार्डियन’ या सशस्त्र ड्रोन्सच्या खरेदीसाठी भारताने वेगाने पावले उचलली आहेत. यापैकी सहा ते नऊ ड्रोन्स लवकरात लवकर मिळावे यासाठी भारताचे प्रयत्‍न सुरू असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या, याकडे अमेरिकी नियतकालिकाने लक्ष वेधले आहे.

leave a reply