चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून मालदीवला ‘डॉर्निअर’ विमान

नवी दिल्ली – भारताने मालदीवला ‘डॉर्निअर’ हे टेहळणी विमान भेट दिले आहे. हिंदी महासागरातील चीनच्या हालचाली वाढत असताना भारत या क्षेत्रातील आपल्या मित्र देशांच्या सहकार्याने ‘कोस्टल सर्व्हिलन्स रडार सिस्टीम’चे (सीएसआरसी) जाळे मजबूत करीत आहे. गेल्यावर्षी मालदीवमध्ये उभारण्यात आलेल्या सेन्सर्सवर आधारित ‘सीएसआर’ यंत्रणेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता मालदीवला ‘डॉर्निअर’ विमान पुरवून भारताने मालदीवच्या सागरी सीमामध्ये चिनी जहाजांच्या हालचालींना वेसण घालण्याची पूर्ण तयारी केली आहे.

'डॉर्निअर'

मंगळवारी मालदीवच्या भूमीवर भारतीय नौदलाचे ‘डॉर्निअर’ विमान उतरले. हिंदी महासागरातील ‘विशेष आर्थिक क्षेत्रा”त (ईईझेड) भारत आणि मालदीव संयुक्तरीत्या गस्त घालते. हे ‘डॉर्निअर’ विमान या गस्तीसाठी सहाय्य करील. तसेच या सागरी क्षेत्रात चाचेगिरी, दहशतवादविरोधी कारवाई यासारखे प्रमाण वाढले आहेत. एप्रिल महिन्यात मालदीवच्या सागरी क्षेत्रात पाच स्पीडबोट आणि दोन लहान बोटी संशयित दहशतवाद्यांनी पेटवून दिल्या होत्या. त्यामुळे या सागरी क्षेत्रातील गस्तीसाठी ‘डॉर्निअर’ उपयुक्त ठरेल. तसेच या विमानाने या क्षेत्रात चिनी जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध मच्छिमारीवर पाळत ठेवता येईल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

२०१६ साली अब्दुला यामिन मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदावर असताना मालदीवने भारताकडे ‘डॉर्निअर’विमानाची मागणी केली होती. पण मालदीव चीनच्या बाजुने झुकत चालल्यानंतर भारत आणि मालदीवच्या संबंधामध्ये कटुता आली. त्याचा परिणाम दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यावर झाला होता. पण २०१८ साली सोलिह यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘डॉर्निअर’चा मार्ग सुकर झाला. ‘मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स'( एमडीएनएफ) हे ‘डॉर्निअर’ ऑपरेट करील. यासाठी भारतीय नौदलाने मालदीवच्या पायलट, हवाई निरीक्षक आणि इंजिनिअर्संना प्रशिक्षण दिले आहे.

भारत आणि मालदीव हे मित्र देश या सागरी क्षेत्राचे चाचेगिरी, तस्कर आणि दहशतवाद्यांपासून रक्षण करतील’, असा विश्वास मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच हा भारत-मालदीव सहकार्याचा नवा अध्याय असल्याचे मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया दिदी यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच हिंदी महासागरातील शांतता व सुरक्षेसाठी अमेरिकेने मालदीवसोबत संरक्षण सहकार्य करार केला होता. यानुसार मालदीवच्या बेटावर अमेरिकेला तळ स्थापन करण्याची परवानगी दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. अमेरिका आणि मालदीवने या वृत्त नाकारले असले तरी अमेरिका आणि मालदीवमधील संरक्षण करार आणि भारत आपल्या या मित्र देशाबरोबर वाढवीत असलेले सहकार्य चीनच्या या क्षेत्रातील महत्वाकांक्षाना वेसण घालणारे ठरत आहे.

 

leave a reply