सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानचे वाभाडे काढले

संयुक्त राष्ट्रसंघ – संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानचे भारताने वाभाडे काढले आहेत. आपल्याकडून झालेल्या वंशसंहाराचे उत्तरदायीत्त्व न स्वीकारणारा देश दुसऱ्यांवर बेजबाबदारपणे आरोप करीत असल्याचे धडधडीत उदाहरण पाकिस्तानमुळे समोर आल्याचा ठपका भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. काजल भट यांनी ठेवला. काश्मीर प्रकरणी पाकिस्तान भारताच्या विरोधात विद्वेषी आणि खोडसाळ प्रचाराची मोहीम राबवित असल्याचा आरोप यावेळी डॉ. काजल भट यांनी केला.

सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानचे वाभाडे काढले50 वर्षांपूर्वी पाकिस्तानने त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली जनतेचा वंशसंहार घडवून आणला होता. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याची साधी कबुली देखील पाकिस्तानने आत्तापर्यंत दिलेली नाही. असा देश काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतावर खोटेनाटे आरोप करीत आहे. वंशसंहाराचा गुन्हा करून इतरांवरच त्याचे आरोप करणाऱ्या पाकिस्तानसारखे बेजबाबदारपणाचे दुसरे उदाहरण सापडणार नाही. यासंदर्भात पाकिस्तानकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवता येणार नाही. पण या देशाने कमीत कमी सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा सन्मान कायम ठेवावा, इतकी अपेक्षा नक्कीच ठेवता येईल, अशी खरमरीत टीका डॉ. भट यांनी केली.

त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानातील मुले, महिला, बुद्धिमंत यांचे हत्याकांड घडवून पाकिस्तानने त्याचा युद्धातील डावपेचांसाठी वापर केला होता. हे सारे पाकिस्तानने योजनाबद्धरित्या घडवून आणले होते, याकडे डॉ. काजल भट यांनी लक्ष वेधले. दरम्यान, पाकिस्तान सध्या अंतर्गत समस्यांनी ग्रासलेला असून देशाचे तीन तुकडे पडतील, असे या देशाचे माजी पंतप्रधानच सांगत आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाळात बुडालेली असून यातून बाहेर पडणे पाकिस्तानसाठी अवघड बनल्याचा दावा केला जातो. अशा स्थितीतही आपण काश्मीरचा प्रश्न सोडून दिलेला नाही, हे दाखविण्यासाठी पाकिस्तान धडपडत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान पुन्हा पुन्हा काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून आपले हसे करून घेत आहे.

leave a reply