युरोपिय महासंघाच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाचे उत्पादन व निर्यातीत वाढ

मॉस्को – युरोपिय महासंघाने रशियातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर बंदी टाकण्यास शुक्रवारी अखेर मान्यता दिली. या बंदीतून महासंघाच्या पाच सदस्य देशांना सवलत देण्यात आली आहे. महासंघाने घेतलेल्या बंदीच्या निर्णयाचा रशियावर फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र समोर आले आहे. रशियाने मे महिन्यात दरदिवशी एक कोटी दोन लाख बॅरल्स तेलाचे उत्पादन सुरू केल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली. कच्च्या तेलाच्या निर्यातीतही 13 टक्क्यांची भर पडल्याचा दावा करण्यात आला आहे.

कच्च्या तेलाचे उत्पादनगेल्या काही दिवसात युरोपिय देशांकडून होणाऱ्या रशियन इंधनआयातीचा मुद्दा चांगलाच चिघळला होता. हंगेरीसारख्या सदस्य देशाने याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेने महासंघाची कोंडी झाल्याचे समोर आले होते. मात्र त्यावर सवलतींच्या रुपात तोडगा काढत महासंघाने कोंडी फोडल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी रशियन तेलावर टाकण्यात आलेल्या बंदीची माहिती दिली. त्यात हंगेरी, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, बल्गेरिया व क्रोएशिया या पाच देशांना सूट देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

कच्च्या तेलाचे उत्पादनमहासंघातील हे पाचही देश पर्यायी व्यवस्था कार्यरत होईपर्यंत रशियन तेलाची आयात करु शकणार आहेत. या देशांव्यतिरिक्त इतर देश रशियाकडून आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाची आयात या वर्षअखेरपर्यंत थांबविणार आहेत. यामुळे रशियातून युरोपात येणाऱ्या कच्च्या तेलापैकी 90 टक्के तेल बंद होईल, असा दावा केला जातो. युरोपिय महासंघ रशियन तेलाच्या आयातीसाठी प्रतिदिनी 45 कोटी डॉलर्स मोजत असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, युरोपिय महासंघासह पाश्चिमात्य देशांनी टाकलेल्या बंदीचा रशियावर फारसा परिणाम होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्यात रशियाने आपल्या कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन 1 कोटी, दोन लाख बॅरल्सपर्यंत वाढविले आहे. एप्रिल महिन्यात हे प्रमाण एक कोटी बॅरल्सच्या जवळपास होते. उत्पादनाबरोबरच रशियन तेलाच्या निर्यातीतही भर पडली आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये रशियन कंपन्यांनी 10.27 कोटी टन तेलाची निर्यात केल्याची माहिती रशियन माध्यमांनी दिली. यात आशियाई देशांचा वाटा मोठा असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply